

पोखरापूर : लक्झरी बसचा दरवाजा उघडा ठेवल्याने चालत्या बसमधून पडून ३५ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना १५ मे रोजी घडली होती. मंगळवारी २७ मे रोजी उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावच्या हद्दीत हा अपघात घडला होता. नागेश गिरीमलाप्पा परतकर असे अपघातातील मृताचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश गिरीमलाप्पा परतकर (रा.मडीयाळ आळंद, जि. कलबुर्गी सध्या रा.पुणे) हा लक्झरी बसमधून दि.१५ मे रोजी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने येत होता. चालक निष्काळजीपणे बसचा दरवाजा उघडा ठेवून भरधाव वेगात बस चालवित असताना मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावच्या हद्दीत लक्झरी बस आली असता बसमधील नागेश परतकर हा बसच्या दरवाज्यातून खाली पडून गंभीर जखमी झाला.
त्याला उपचारासाठी सोलापूर येथे दाखल करण्यात आले. त्याचा उपचारादरम्यान दि.२७ मे रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी नागेश यांच्या आई कस्तुरीबाई गिरीमलाप्पा परतकर यांनी लक्झरी बस चालकाच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.