

सोलापूर : भरधाव येणार्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी थांबलेल्या आयशरला धडकली. या अपघातात 24 वर्षीय तरुण ठार झाला तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 8) दुपारी सव्वातीन वाजता मोहोळजवळील लांबोटी ब्रीज येथे घडला. विपुल आप्पाराव देवकते (वय 24, रा. दाईंगडेवाडी, ता. मोहोळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. या अपघातात मयत विपुलचा मित्र जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेली माहिती अशी की, मोहोळ येथून सोलापूरकडे दुचाकीवरून दोघे मित्र येत होते. यावेळी लांबोटी ब्रीजवर थांबलेल्या आयशरला पाठीमागून जोराची धडक दिली. यात विपुलच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. विपुलने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो सकाळी घरातून निघताना आईला म्हणाला की, आई मी कॉलेजच्या कामासाठी सोलापूरला जाऊन येतो.
पण, तो सोलापूरला पोहचण्याच्यापूर्वीच त्याला काळाने गाठले. तो ज्या कामासाठी घरातून निघाला होता ते काम तर झालेच नाही, शेवटी त्याचा मृतदेह घरी गेला. या घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांनी सिव्हिलमध्ये गर्दी केली होती. त्याच्या आई-वडिलांनी त्याला पाहताच आक्रोश केला. अपघातात विपुलचा मृत्यू झाला याची माहिती त्यांच्या मित्रांना कळताच त्यांनाही अश्रू अनावर झाले. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.