

नियम डावलून दात्याचे 60 मिली जादा घेतले जातेय रक्त
विविध उपक्रमांतून जमवलेले रक्त परस्परच विकले जाते जादा दराने
रक्तातील प्लाझ्मा विक्रीसाठी वापरला जातोय बेकायदेशीर मार्ग
रक्तदानाची चळवळ बदनाम करणार्यांना कायद्याचा धाक दाखविण्याची गरज
सुमित वाघमोडे
सोलापूर : ‘रक्तदान हे श्रेष्ठदान’ अशी प्रेरणादायी म्हण आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहे. मात्र, याच दानातून गोळा झालेल्या रक्ताचा सोलापुरात काळा बाजार होतोय. रक्ताची चक्क तस्करी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे तस्करीसाठी जास्त रक्त उपलब्ध व्हावे म्हणून रक्तदानप्रसंगी नियमांना डावलून 60 एमएल जास्तीचे रक्त काढून दात्याच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार सुरू आहे. रक्तदानासंबंधीच्या अटी व नियमांना अक्षरशः पायदळी तुडवले जात आहे. सोलापुरातून देशभर रक्ताची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू आहे. तीन राज्यांच्या सीमेवर असलेले सोलापूर तस्करीसाठी सॉफ्ट टार्गेट म्हणून तस्करांनी निवडल्याचेही दै. ‘पुढारी’ प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.
रक्तदान शिबिरे घेण्यात सोलापूर हे राज्यात आघाडीवर आहे. शहरासह जिल्ह्यात महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर रक्तदानाने साजरी करण्याची प्रथा आहे. तसेच सण, नेत्यांचे वाढदिवस, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनालाही सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरे भरवली जातात. रक्त पिशव्यांची संख्या वाढावी यासाठी दात्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट दिले जात आहे. रक्तदान शिबिरावेळी चहा, बिस्कीट, प्रमाणपत्र यासाठी केवळ वीस रुपये खर्च करावेत अशा शासनाच्या सूचना आहेत. परंतु तस्करांशी निगडित काही रक्तपेढ्या संकलन वाढविण्यासाठी 500 रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंतचे गिफ्ट देत आहेत. त्यातच आता अशा संकलित झालेल्या रक्ताच्या पिशव्यांची तस्करी होत असल्यामुळे रक्तदानाची चळवळ बदनाम होऊ लागली आहे.
शहर व जिल्ह्यात 19 रक्तपेढ्या आहेत. त्या माध्यमातून वर्षभरात एक लाखापेक्षा जास्त पिशव्या रक्त संकलित होते. या रक्ताचा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी नव्हे तर तस्करांना धनाढ्य बनवण्यासाठी वापर केला जात असल्याचे दै. ‘पुढारी’ प्रतिनिधीच्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले.
रक्त पिशव्यांची तस्करांची वाढती भूक शमविण्यासाठी काही रक्तपेढ्याही त्यामध्ये सामील झाल्या आहेत. दात्यांना भरभक्कम गिफ्ट देण्यासह आमिषे दाखविले जातात. विविध संस्था, संघटना, नेत्यांकडे रक्तदान शिबिरे घेण्यासाठी तस्करांच्या सांगण्यावरून या बदनाम रक्तपेढ्यांचे प्रतिनिधी प्रयत्न करत आहेत.
अशा बदनाम रक्तपेढ्यांची शिबिरे मिळविण्याची एकमेकांत तुल्यबळ स्पर्धाच सुरू आहे. यासाठी तस्करांकडून मिळालेल्या बेसुमार गिफ्ट, रकमेचा बेकायदा वापर केला जात असल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. संकलित केलेले रक्त कशा पद्धतीने वापरात आणले जाते याची कुठेही नोंद होत नसल्याचीही बाब समोर आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरात रक्त हे जीव वाचविण्याचे नव्हे तर पैसे कमविण्याचे साधन बनल्याचे सिद्ध होत आहे.
शरीरातून काढताहेत जादा रक्त
नियमानुसार रक्तदात्याच्या शरीरातून एकावेळी फक्त 350 एमएल रक्त संकलित करण्याची परवानगी रक्तपेढ्यांना परवानगी असते. परंतु, सोलापुरात मात्र काही रक्तपेढ्या तस्करीसाठी म्हणून बेकायदा चक्क 410 एमएल रक्त संकलित केले जात असल्याची पिशवीच स्टिंग ऑपरेशनदरम्यान दै. ‘पुढारी’च्या हाती लागली आहे. हा त्या दात्याच्या जीवाशी खेळ आहे.