

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा शंखनाद अद्याप अधिकृतरीत्या झाला नसला तरी राजकीय पक्षांनी सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. विशेषतः यावेळी लक्ष वेधून घेत आहे, ती म्हणजे तुल्यबळ आणि सक्षम माजी नगरसेवकांची सुरू असलेली ‘पळवापळवी’. भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादीचे (दोन्ही गट) स्थानिक नेते हे माजी नगरसेवकांच्या संपर्कात असून प्रत्येक पक्ष दुसर्या पक्षातील बळकटीचे चेहरे खेचून आणण्याच्या प्रयत्नात आहे. राजकीय पळवापळवीचा हा खेळ निवडणुकीत आणखी चुरस निर्माण करत आहे. एकूणच राजकीय पक्षांचा खेळ रंगात आला आहे.
महापालिकेच्या 2015 च्या निवडणुकीत विजयी ठरलेले अनेक नगरसेवक आजही मतदारसंघात प्रभावशाली असून त्यांचा कार्यकर्त्यांवरचा प्रभाव, निधी मिळवण्याची क्षमता आणि जनसंपर्क यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारीची मागणी आहे. यामुळेच हे माजी नगरसेवक हॉट केक बनले आहेत. उमेदवारी मिळाली की मतदारसंघात त्यांचा अनुभव हा फायद्याचा मुद्दा ठरणार आहे. महापालिकेत पूर्वी अपक्ष म्हणून विजयी झालेले काही नगरसेवक हे किंगमेकर ठरू शकतात, हे लक्षात घेता, सर्वच पक्ष त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत.
भाजपकडून काही महिन्यांपासून ‘ऑपरेशन कमळ’अंतर्गत माजी नगरसेवकांना गळ घातली जात आहे. काँग्रेस व शिवसेनेतील नाराज नगरसेवकांना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून विकासाचे व्हिजन, निधी, आणि सत्तेतील भागीदारीचे आमिष दाखवत प्रवेश दिला जात आहे. काहींना जिल्हा, शहर कार्यकारिणीत पद दिले जात आहे. काहींना आगामी निवडणुकीतील उमेदवारीची गॅरंटी दिली जात आहे.
शहर राष्ट्रवादी (अजित पवार गट) स्थानिक नेतृत्वाच्या एककल्ली धोरणांमुळे अनेक जुने नगरसेवक नाराज आहेत. याचा फायदा घेत भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्याकडून त्यांच्या गोटातील नाराज माजी नगरसेवकांना खेचून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी स्थानिक गटबाजी आणि उमेदवारीच्या दावेदारीवरून वाद निर्माण झाले असून, हाच वाद भाजप किंवा इतर पक्षांची ‘संधी’ बनला आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष केवळ राज्य पातळीवरच नाही, तर कोल्हापुरातही जाणवतो. 2015 मध्ये शिवसेनेत असलेले नगरसेवक आता दोन गटांत विभागले गेले आहेत. शिंदे गटाकडून ‘सत्ता आमच्याकडे आहे’ हे हत्यार वापरून नगरसेवकांना खेचण्याचे प्रयत्न होत आहेत. ठाकरे गटाकडून ‘निष्ठा आणि शिवसेनेचा खरा वारसा आमच्याकडेच आहे’ अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांना जोडले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि अजित पवार गट दोघेही स्वतंत्ररीत्या माजी नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. यातील काही माजी नगरसेवक राजकीय दृष्टिकोनाने प्रभावी असून कोणताही गट त्यांना गमवायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही गट त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी पद, निधी, राजकीय आश्वासने यांची खैरात करत आहेत.
या सार्या घडामोडी पाहता कोल्हापुरात आगामी निवडणुकीपूर्वी उमेदवारीसाठी बाजार मांडला गेल्याचे चित्र दिसते. कार्यकर्त्यांपेक्षा चेहरे, नावे आणि पूर्वीचा प्रभाव हेच पक्ष बदलण्याचे निकष ठरत आहेत. पक्ष महत्त्वाचा नाही, उमेदवारी आणि निधी महत्त्वाचा अशी भावना अनेक ठिकाणी उमटते आहे.
शारंगधर देशमुख -शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
सत्यजित कदम - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
स्मिता माने - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
अर्चना पागर - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
कविता माने - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
अॅड. सुरमंजिरी लाटकर - काँग्रेस (राष्ट्रवादी)
दिलीप पोवार - भाजप (काँग्रेस)
सरस्वती पोवार - भाजप (काँग्रेस)
उत्तम कोराणे - भाजप (राष्ट्रवादी)
सीमा कदम - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
पूजा नाईकनवरे - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
निलोफर आजरेकर - शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
मेहजबीन सुभेदार - काँग्रेस (ताराराणी आघाडी)
सरीता मोरे - शिवसेना शिंदे गट (राष्ट्रवादी)
ईश्वर परमार - काँग्रेस (ताराराणी आघाडी)
शमा मुल्ला - काँग्रेस (राष्ट्रवादी)
भाग्यश्री शेटके - काँग्रेस (ताराराणी आघाडी)
संभाजी जाधव - शिवसेना शिंदे गट (भाजप)
अनुराधा खेडकर - शिवसेना शिंदे गट (राष्ट्रवादी)
ललिता बारामते - शिवसेना शिंदे गट (भाजप)
रिना कांबळे - शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
प्रतिभा नाईकनवरे - शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
दिगंबर फराकटे - शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
अभिजित चव्हाण - शिवसेना शिंदे गट (ठाकरे गट)
रशीदअली बारगीर - शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
सुनंदा मोहिते - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
गीता गुरव - शिवसेना शिंदे गट (भाजप)
प्रकाश नाईकनवरे - शिवसेना शिंदे गट (ताराराणी आघाडी)
जहाँगीर पंडत - शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
भरत लोखंडे - शिवसेना शिंदे गट (काँग्रेस)
आनंदराव खेडकर - शिवसेना शिंदे गट (राष्ट्रवादी)