

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
भैय्या चौक हा शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाचा चौक आहे. येथील जुन्या ब्रिटिशकालीन पुलाच्या पाडकामानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली. पुलाच्या गोलाकार पिलरचे आरसीसी खांब तयार करण्यात येत आहेत. दोन्ही बाजूचे आठ याप्रमाणे १६ मुख्य पिलरचे काँक्रीटीकरण भरून घेतले असून, उर्वरित पिलरचे काम गतीने सुरू आहे.
या पुलाच्या मुख्य पिलरचे काम झाल्यानंतर पुलावर टाकण्यात येणारे गर्डरच्या कामालाही सुरुवात होईल. येत्या डिसेंबरपर्यंत संबंधित ठेकेदाराला हा प्रकल्प पूर्ण करावे लागणार आहे. आजूबाजूची जमीन समतल करण्याचे कामही तसेच सुरू आहे.
हे काम सुरू असल्याने भैय्या ते मरिआई चौक या दरम्यानच्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. लोकसंख्येसह वाहनांची वाढलेल्या संख्या गृहीत धरून येथील पुलाचे काम सुरू आहे.
याचे काम सुरू असल्याने नागरिकांना एकतर ५४ मीटरच्या रस्त्याने व मोदीच्या अंडरपासच्या पुलाखालून ये-जा करताना नागरिकांना वळसा घालून जावे लागते. यामुळे, कोणत्याही मार्गाने ये-जा केली तरी वेळ हा जातोच. मात्र, रेल्वेस्थानकावर असलेल्या पुलाचा वापर पायी ये-जा करणारे नागरिक करतात. हा पूल वेळेत होणे गरजेचे आहे.
या पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. येथील पुलाचे काम दिल्लीस्थित कंपनीकडून सुरू आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून संबंधित बांधकाम करणाऱ्या कंपनीला डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे.
"रेल्वेवरील पुलाची उंची अन्य पुलासारखी नसते. ६.५० मीटर उंचीच्या पुलाचे काम करण्यात येणार आहे. येथील पुलाच्या पिलरचे काही प्रमाणात काम करण्यात आले आहे. संबंधित कंपनीकडून डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत."
स्वप्नील कासार, महाप्रबंधक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर विभाग