Solapur Accident | सोलापूर - बार्शी मार्गावर डंपरच्या धडकेत शेतकरी जागीच ठार, एक गंभीर जखमी

कारंब्याजवळ संतप्त जमावाने डंपर पेटवला
Solapur Barshi Road Accident
धोंडाप्पा गुराप्पा जोडमुटे Pudhari
Published on
Updated on

Solapur Barshi Road Accident

गुळवंची : सोलापूर-बार्शी मार्गावरील उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावाजवळ सोमवारी (दि.८) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास भीषण अपघात घडला. विटा घेऊन जाणारा डंपर व दुचाकीमध्ये अपघात झाला. या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अपघातात धोंडाप्पा गुराप्पा जोडमुटे (वय ७०) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर मल्लिनाथ हिप्परगी (वय ६० ) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्त डंपरला आग लावली.

शेतकरी शेताकडे जात असताना काळाचा घाला

मिळालेल्या माहितीनुसार, धोंडाप्पा जोडमुटे आणि मल्लिनाथ हिप्परगी हे दोघे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH 13 AM 6875) शेताकडे जात होते. दरम्यान, मातोश्री वस्तलाबाई मुनाळे प्रशालेच्या समोर आले असता, पाठीमागून येणाऱ्या विटांनी भरलेल्या भरधाव डंपरने (क्रमांक MH 20 DE 4266) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, धोंडाप्पा जोडमुटे यांचा जागीच मृत्यू झाला.

Solapur Barshi Road Accident
Solapur News: मोहोळमध्ये उड्डाणपुलाखाली विक्रेत्यांमुळे वाहतुकीची कोंडी

जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

अपघाताची भीषणता पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेले मल्लिनाथ हिप्परगी यांना तातडीने रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

संतप्त जमावाकडून डंपरची जाळपोळ; पोलीस व अग्निशामक दल धावले

अपघाताचे वृत्त समजताच कारंबा व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर आले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या जमावाने अपघातग्रस्त डंपर जागेवरच पेटवून दिला. डंपरने पेट घेतल्याने सोलापूर-बार्शी महामार्गावर काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

Solapur Barshi Road Accident
Solapur Theft: सौंदणेतील मंदिरातून दागिन्यांसह रोख रकमेची चोरी

घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम व त्यांचे पथक आणि अग्निशमन विभागाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने डंपरला लागलेली आग आटोक्यात आणली, तर पोलिसांनी संतप्त जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस या अपघाताचा व पुढील घटनेचा सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news