

पोखरापूर : मोहोळ तालुक्यातील शेजबाभुळगाव हद्दीतील सौंदणे कट येथील तुळजाभवानीच्या मंदिरातील तुळजाभवानीच्या मूर्तीसह एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दि. ४ जून रोजी घडली असून याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शेजबाभुळगाव हद्दीतील सौंदणे कट येथील तुळजाभवानी मंदिरात दैनंदिन पूजाअर्चा सुरेश श्रीमंत पवार हे करतात. दि.४ जुन रोजी पुजारी सुरेश पवार कुलूप लावून घरी तांबाळे येथे गेले. त्यानंतर दि. ५ रोजी सकाळी ६ च्या पुजा करण्यासाठी गेले असता त्यांना प्रवेशद्वरास व मंदीराच्या गाभा-यास असलेले कुलुप नसल्याचे दिसले.
देवास असलेले चांदिचे साहित्य, सोन्याचे गंठण, चांदीची मुर्ती, दान पेटी दिसली नाही. ग्रामस्थांना बोलवून घेऊन मंदिराच्या परिसरात पाहणी केली. साहित्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद देत २३ ग्राम वजनाचे दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण,१ लाख २५ हजार रुपये किमतीची तुळजाभवानी देवीची चांदीची मूर्ती,व १० हजार रुपये किमतीचा एक चांदीचा टोप, दानपेटीतील ३० हजार रुपये असे एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद दिली.