

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनसाठी सोमवारी (दि.30) चुरशीने मतदान झाले. एक हजार 569 मतदारांपैकी एक हजार 331 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, याची टक्केवारी 84.83 टक्के इतकी झाली. रात्री उशिरा अधिकृत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीत सकाळी साडेसातला मतदानास सुरुवात झाली. सकाळी दहा नंतर मतदानासाठी गर्दी व्हायला सुरुवात झाली. वकील मतदार गटागटाने येऊन मतदान करीत असल्याचे दिसले.
या निवडणुकीत सत्ताधारी विधी एकता पॅनल समोर इतर अपक्षांनी आव्हान उभे केले होते. यंदा बारच्या सभासदांची संख्या कमी असल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा होती मात्र दरवर्षीप्रमाणे 85 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. सायंकाळी साडेपाच पर्यंत एक हजार 331 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान मतमोजणीस सुरुवात झाली. पहिला निकाल येण्यासाठी सुमारे तीन तासांची प्रतीक्षा करावी लागली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी (दि.1) दुपारी दोन वाजता सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामध्ये नूतन पदाधिकार्यांची घोषणा आणि पदग्रहण सोहळा होणार आहे. या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. व्ही. पी. शिंदे व सहनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव मनोजकुमार पामूल यांनी काम पाहिले.