सोलापूर : ट्रकखाली चिरडून 6 महिलांचा मृत्यू

सोलापूर : ट्रकखाली चिरडून 6 महिलांचा मृत्यू

महूद/सांगोला, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर-कराड रस्त्यावर चिकमहूद (ता. सांगोला) गावाजवळ बंडगरवाडी येथे शेतातील काम करून साडेचार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घराकडे जाण्यासाठी निघालेल्या महिला मजूर रस्त्याच्या कडेला थांबल्या होत्या. त्या महिला मजुरांच्या अंगावरून 20 चाकी मालवाहतूक ट्रक गेला. त्यात पाच महिला मजुरांचा मृत्यू झाला. दोन महिला मजूर जखमी असल्यामुळे त्यांना पंढरपूरच्या खासगी दवाखान्यात दाखल केले होते; मात्र डॉक्टरांनी त्यापैकी एका महिलेस मृत घोषित केले. त्यामुळे या अपघातात एकूण सहा महिला मजूर ठार झाल्या आहेत. या सर्व महिला मजूर कटफळ (ता. सांगोला) येथील आहेत. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर-कराड रस्त्यावर चिकमहूद गावाजवळ बंडगरवाडी स्टॉप आहे. त्या ठिकाणी कटफळ गावातील शेतकाम करणार्‍या महिला चिकमहूद येथील शेतकर्‍याच्या शेतीतील काम संपून कटफळ येथील घराकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहात थांबल्या होत्या. अचानक पंढरपूरहुन कराडकडे जाणारा 20 चाकी मालवाहतूक ट्रक क्रमांक एम. एच. 50 एन 4757 हा वळणावर वळत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडला आहे.

या अपघातामध्ये महिला शेतमजूर इंदुबाई बाबा इरकर (वय 50), भिमाबाई लक्ष्मण जाधव (वय 45), कमल यल्लाप्पा बंडगर (वय 40), सुलोचना रामा भोसले (वय 45), अश्विनी शंकर सोनार (वय 35) या जागीच ठार झाल्या. मनिषा आदिनाथ पंडित (वय 25), मैनाबाई दत्तात्रय बंडगर (वय 50) या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याठिकाणी डॉक्टरांनी मनिषा आदिनाथ पंडित यांना मृत घोषित केले. मालवाहतूक ट्रक ग्रामस्थांनी पकडून ठेवला आहे.

काही काळ तणावाचे वातावरण

अपघात घडल्यानंतर घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोणत्याही परिस्थितीत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती; मात्र त्या ठिकाणी तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांनी त्यांची समजूत काढली. शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news