

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
सोलापूर जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, टंचाईग्रस्त भागातील नागरिक आणि पशुधनला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. १६ ऑक्टोबर रोजीच्या स्थितीनुसार जिल्ह्यातील १३९ गावे आणि ७५२ वाड्यांमधील २ लाख ६२ हजार ४४९ नागरिकांना तसेच ९५ हजार ९३२ पशुधनला १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ४० विहिरी आणि २१ बोरवेल असे एकूण ६१ जलस्रोत अधिग्रहण करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू असून, या दोन तालुक्यांमध्ये मिळून ७४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील टँकरद्वारे होणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यात या दोन्ही तालुक्यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी ही माहिती दिली. टंचाईग्रस्त गावांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
६१ जलस्रोतांचे अधिग्रहण
टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबरोबरच टंचाईग्रस्त भागात पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्यावरही प्रशासनाचा भर आहे. त्यानुसार जिल्ह्यात ४० विहिरी आणि २१ बोरवेल अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. या जलस्रोतांमुळे संबंधित भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यास मदत होत आहे.
१३९ गावांना १३५ टँकरने पाणीपुरवठा
तालुकानिहाय आकडेवारीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील ३७ गावांसाठी ४० टँकर सुरू आहेत. सांगोला तालुक्यातील २६ गावांना ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माढा तालुक्यातील १४ गावांसाठी १६, माळशिरस तालुक्यातील १० गावांसाठी १०, तर करमाळा तालुक्यातील १२ गावांसाठी नऊ टँकर सुरू आहेत. अक्कलकोट तालुक्यातील १५ गावांसाठी आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाच गावांसाठी सात, दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाच गावांसाठी सहा, बार्शी तालुक्यातील १३ गावांसाठी तीन, तर मोहोळ तालुक्यातील दोन गावांसाठी दोन टँकर सुरू आहेत.