सोलापूर : उत्तरमध्ये कारंबा,अकोलेकाटी, गा.दारफळ, पाकणीत सत्तांतर

सोलापूर : उत्तरमध्ये कारंबा,अकोलेकाटी, गा.दारफळ, पाकणीत सत्तांतर

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : उत्तर सोलापूर तालुक्यातील बारा गावच्या सरपंच ग्रामपंचायत निवडणूकी करिता १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य निवडणूक मतमोजणी निकाल दि. 20 मंगळवारी सोलापुरातील नूतन प्रशालेत मतमोजणी पार पडली.

यामध्ये बारा ग्रामपंचायत पैकी कवठे, शिवणी, पाकणी, नरोटेवाडी, रानमसले, अकोलेकाटी, कारंबा, नंदुर समशापुर या आठ ग्रामपंचायतीवर माजी आमदार दिलीप माने समर्थकांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीने विजय मिळवलेल्या गावडी दारफळ मध्ये कल्याण काळे गटाने उमेश पाटील गटाचे बालाजी पवार व दिलीप माने गटाचे नानासाहेब पवार यांचा पराभव केला आहे.

डोणगाव, कौवठाळीत ग्रामपंचायतेत भाजप सत्तेवर आले आहे. मार्डीमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या आघाडीने सत्ताधार्‍याचे वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या पाच वर्षात विविध पुरस्कार प्राप्त केलेल्या कारंबा गावचा निकाल मात्र धक्कादायक लागत सत्तांतर झाले आहे. येथील भाजपचे विनायक सुतार यांच्यासह एक महिला ग्रामपंचायत सदस्य वगळता सत्ताधाऱ्याचा पराभव झाला आहे.

जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मार्डी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार बंधू इंद्रजीत पवार व राष्ट्रवादीचे अविनाश मार्तंडे यांच्यासाठी ही ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. भाजपाची माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या सुनबाई प्रांजली गणेश पवार या सरपंच पदी विजयी झाल्या त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष सुवर्णा झाडे खेलबुडे यांचा पराभव केला. सुरुवातीला एकतर्फी वाटलेली निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.

सुरुवातीला एक ते दोन वार्डामध्ये राष्ट्रवादीच्या झाडे यांनी आघाडी घेतली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीची कामगिरी निराशाजनक झाली असून पक्षाच्या हातून अकोलेकाटी, रानमसले गावातून सत्ता गेली. अकोलीकाटीत माने गट, भाजप, प्रहार संघटना एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवला आहे. पाकणीत सत्तापरिवर्तन होत भाजपचे सुनील गुंड व राष्ट्रवादीच माजी पंचायत समिती सदस्य हरिदास शिंदे यांना दिलीप माने घटाने सत्तेपासून दूर ठेवले आहे.

मतमोजणी निकालावरून अनेक गावात सरपंच ग्रामपंचायत सदस्य निकालात चुरस पाहायला मिळाली. मतमोजणी प्रतिनिधी म्हणून आलेले प्रतिनिधी आपले सरपंच पदाचे व ग्रामपंचायत सदस्य उमेदवार पराभूत होताच मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. मतमोजणी दिवशी निवडणूक अधिकारी उत्तर तहसीलचे तहसीलदार जयवंत पाटील, इतर कर्मचारी उपस्थित होते तर कुठलाही अनुचित प्रकार घडून येण्याकरिता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सरपंच पदाचे विजयी उमेदवार

  • मार्डी – प्रांजली पवार (भाजप- राष्ट्रवादी युती) मते-२०३९
  • कौठाळी- श्वेता पाटील (भाजप)मते-१२१६
  • डोणगाव- राजश्री आमले (भाजप)मते-११४३
  • गावडी दारफळ – भारत माळी (राष्ट्रवादी)मते-११७५
  • पाकणी-बालाजी येलगुंडे (दिलीप माने गट)मते-८४८
  • कवठे- मारुती इंजीनवाले (दिलीप माने गट)मते-७९४
  • अकोलेकाटी-अंजली क्षीरसागर (दिलीप माने)मते-७२७
  • कारंबा-तुकाराम चव्हाण (दिलीप माने गट)मते-१४१३
  • नरोटेवाडी-उमेश भगत (दिलीप माने गट)मते-३८०
  • नंदूर समशापूर-गंगुबाई व्हनमाने (दिलीप माने गट)मते-६६८
  • शिवणी-प्रियांका खळसोडे (दिलीप माने गट)मते-५३२
  • रानमसले-मनोहर क्षीरसागर (दिलीप माने गट)मते-९९३

चिट्टीने उमेदवारांना दिला कौल

पाकणी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग तीन मध्ये परिनिता शिंदे , अंजली ढेंगळे व शालन गुंड या तिघींना १४९ समान मते पडली. चिट्ठीने परिणीता शिंदे यांना विजय ठरवले.तर कौठाळी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग १ मध्ये अशोक जाधव, समाधान भक्ते यांना १८२ अशी समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे जाधव विजयी झाले.तर प्रभाग तीन मध्येही भाजपचे पॅनेल प्रमुख संग्राम प्रतापराव पाटील, शरद लक्ष्मण माने यांना ३०७ अशी समान मते पडल्याने चिट्टीद्वारे शरद माने हे विजयी झाले तर भाजपचे पॅनल प्रमुख संग्राम पाटील पराभूत झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news