

सोलापूर : जिल्ह्यातील उसाला पहिली उचल तीन हजार ५०० रुपये न मिळाल्यास राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे वाहतूक आणि एसटी बससेवेसह जिल्ह्यातील सर्व दळणवळण ठप्प करण्याचा इशारा माजी खा. तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त करत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
ऊस दरासाठी माजी खा. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या ऐतिहासिक महामोर्चाने जिल्हा प्रशासन आणि साखर कारखानदारांचे धाबे दणाणले. हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी तब्बल १३ तास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर मध्यरात्री एक वाजता जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी आंदोलनस्थळी येऊन लेखी आदेश दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, उसाला पहिली उचल तीन हजार ५०० रुपये दर न दिल्यास कारखानदारांना बाहेर पडू देणार नसल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे कारखानदारांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून दि. १९ नोव्हेंबर रोजी ऊसदराचा अंतिम तोडगा निघेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद राहतील, असे लेखी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तसेच हजारो शेतकऱ्यांसमोर माईकवरून याबाबत स्पष्ट घोषणा केली.
१९ नोव्हेंबरला बैठक
ऊसदराचा अंतिम तोडगा काढण्यासाठी १९ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या चेअरमननी स्वतः उपस्थित राहावे, यासाठी प्रशासनाने पत्र काढले आहे.
कारखाने बंद ठेवण्याची मागणी
महामोर्चानंतर जिल्हाधिकारी आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये तब्बल पाच वेळा बैठका झाल्या. प्रशासनाने १९ नोव्हेंबर रोजी ऊसदराचा तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याची आणि त्याबाबत लेखी हमी देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, केवळ बैठकीचे आश्वासन देऊन चालणार नाही, तर तोडगा निघेपर्यंत जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद ठेवण्याचे लेखी आदेश द्यावेत, अशी ठाम भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली होती. त्याला यश आले आहे.
कारखान्यांना शेतकरीच ठोकणार टाळे!
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट आदेश दिले असतानाही एखादा साखर कारखाना सुरू राहिला, तर शेतकरी शांत बसणार नाहीत. प्रशासनाने दिलेला आदेश हातात घेऊन संबंधित कारखान्यावर जाऊन तो बंद पाडण्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे आता कारखानदारांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करणे अनिवार्य आहे.
तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन
या निर्णायक बैठकीला राजू शेट्टी स्वतः उपस्थित राहणार आहेत. त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिली उचल म्हणून प्रतिटन ३,५०० रुपये देण्याची मागणी केली आहे. या मागणीवर सकारात्मक तोडगा निघाला नाही, तर त्याच ठिकाणाहून पुढील तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात येईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.