

Deepak Kate Custody
सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी आज (दि. १७) सुनावण्यात आली. पोलिसांनी ५ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, अक्कलकोट दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली.
मंगळवारी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली होती. आज पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, त्यांच्याकडून आजच जामीनसाठी न्यायालयात अर्ज केले जाण्याची शक्यता आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी (दि. १३) अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाजाच्या एका कार्यक्रमात शाई फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख आणि श्री स्वामी समर्थ यांचा अनादर केल्याच्या निषेधार्थ शिवधर्म फाउंडेशनच्या संतप्त कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला. नागरी सत्कार आणि मानपत्र कार्यक्रमासाठी गायकवाड आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला होता.
माझ्यावर झालेला हा हल्ला पूर्व नियोजित कट असून हा सरकार पुरस्कृत हल्ला होता. दीपक काटे हा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना गॉड फादर मानतो. त्यामुळे या हल्ल्यामागे तेच खरे मास्टर माईंड आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेऊन आम्हाला न्याय देवा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.