

कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात सोमवारी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शने केली. ‘गायकवाड, महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे’ अशा फलकांसह कार्यकर्ते मैदानात उतरले होते. हल्ला करणार्यांना ठोशास ठोसा असे उत्तर देऊ, असा इशारा देत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील, शिवशाहीर दिलीप सावंत, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, राजू सावंत, हिंदुराव हुजरे पाटील, शशिकांत पाटील यांची भाषणे झाली.
वसंतराव मुळीक म्हणाले, शिवाजी महाराजांची बदनामी यापूर्वी अनेकांनी केली. त्यावेळी हे बेगडी शिवप्रेमी कुठे लपले होते? आता जर हल्लेखोरांवर कठोर कारवाई झाली नाही, तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि उग्र आंदोलन करेल. रुपेश पाटील यांनी आरोप केला की, प्रवीण गायकवाड यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हा नियोजित हल्ला करण्यात आला आहे. सुनीता पाटील म्हणाल्या, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड अधिक प्रबळ होणार आहे. या निदर्शनात इंद्रजित सावंत, उमेश पोवार, बाळासाहेब पाटील, विकास जाधव, भगवान कोळी, अभिजित कांजर, सुधा सरनाईक, शैलजा भोसले, जीवन बोडके, उमेश सूर्यवंशी, हिदायत मणेर, राजू मालेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.