पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रेनिमित्त जास्तीत जास्त भाविकांना सुलभ व जलद दर्शन मिळावे म्हणून श्री विठ्ठल- रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे राजोपचार बंद होते. शुक्रवारी प्रक्षाळ पूजा मोठ्या उत्साहात झाली. यानंतर आषाढी यात्रेची सांगता झाली. त्यानुसार श्री विठ्ठलाचा पलंग शेजघरात ठेवण्यात आला. यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणीचे नित्योपचार सुरू करण्यात आले.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 20 जून रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता. श्री विठ्ठलास लोड व श्री रुक्मिणीमातेस तक्क्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळ पूजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. ते नित्योपचार आज प्रक्षाळ पूजेनंतर सुरू करण्यात आले आहेत. आषाढी एकादशी 29 जून रोजी झाली. यात्रा कालावधीत सुमारे12 ते 15 लाख भाविक आले होते. यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, मुहूर्तानुसार 7 जुलै रोजी श्री विठ्ठलाची व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा झाली. या पूजेच्या सुरवातीला मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले. यानंतर श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा सदस्य संभाजी शिंदे व श्री रुक्मिणी मातेची प्रक्षाळपूजा कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच देवाचा शिणवटा, थकवा घालविण्यासाठी आयुर्वेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात आला आहे. आता श्रींची काकडा आरती, नित्यपूजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात आले आहेत.
प्रक्षाळपूजेनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. पूजेवेळी मंदिरात पौराहित्य करणारे कर्मचारी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते.