

Pannalal Surana Passes Away
सोलापूर : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नळदुर्ग येथील घरी मंगळवारी रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास सुरू झाला होता. त्यांना सोलापूर शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच पार्थिव शासकीय रुग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पन्नालाल सुराणा हे ज्येष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत म्हणून देशभरात ओळखले जात होते. त्यांनी राष्ट्रसेवा दलात असताना आपल्या कार्याची सुरुवात केली होती. समाज प्रबोधन नावाच्या संस्थेचे सचिव म्हणून काम केले. जयप्रकाश नारायण यांनी केलेल्या आंदोलनात ते साथीदार होते, ज्यामुळे त्यांचे नाव देशभरामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यांनी पत्रकारिता देखील केली आणि ते मराठवाडा दैनिकाचे संपादक होते. शेती, बेरोजगारी आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले आहे. त्यांच्याकडे समाजवादी पक्षाच्या राज्याचं मुख्य पद देखील होते. पन्नालाल यांच्या निधनामुळे संपूर्ण सोलापूरसह देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यभरातून एक समाजवादी विचारवंत हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.