

मोहोळ : योग्य उपचार न करता वेळकाढूपणा केल्याने डॉ. प्रतिभा व्यवहारेंचा मृत्यू झाल्याची तक्रार पती डॉ. अमित मधुकर व्यवहारे यांनी केली आहे. पंढरपूर येथील लाईफ लाईन व मोहिते हॉस्पिटलवर कारवाईची मागणी त्यांनी केली. मोहिते हॉस्पिटल डॉ. पी. बी. मोहिते, लाईफ लाईन डॉ. संजय देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. मंजुषा देशमुख यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच पत्नी डॉ. प्रतिभा यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात यावी, असे मोहोळ पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये पती डॉ. अमित व्यवहारे यांनी म्हटले आहे.
तक्रार अर्जात दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा या 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. दि. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता अचानक रक्तस्त्राव होऊ लागल्याने पंढरपूर येथील डॉ. पी. बी. मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉ. पी. बी. मोहिते यांनी होत असलेल्या त्रासाच्या तक्रारीची दखल न घेता गांभीर्याने उपचार न करता वेळकाढूपणा केला. उपचारासाठी आवश्यक सुविधा नाहीत. लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉ. संजय देशमुखसह डॉ. मंजुषा देशमुख यांनी तपासणी केली. मात्र त्यांनी तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली नाही. सकाळी बाळ पोटात दगावले, परिस्थिती फार गंभीर झाली आहे, असे सांगत कोणतेही उपचार न करता तेथून पाठविले. त्यानंतर सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारासाठी विलंब झाल्याने 1 डिसेंबरला मृत्यू झाला.