

फलटण : फलटणमधील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत व्यवस्थेचे वाभाडे काढले. मृत महिलेला न्याय मिळवून देण्यापेक्षा रुपाली चाकणकरांनी आणि पोलिस अधीक्षक तुषार दोशींनी तिचं चारित्र्यहनन केलं, असा आरोपही अंधारेंनी केला. तसेच, जयकुमार गोरे हे त्या महिलेचे चारित्र्य ठरवणार का? त्या आधी गोरेंनी स्वतःच्या चारित्र्याकडे बघावं, असा टोलाही अंधारेंनी लगावला. या प्रकरणात जी सहा नावे आली आहेत, त्यांना चौकशीच्या कक्षेत घ्यावे, अशी मागणीही अंधारेंनी केली.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील मृत डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, यासाठी सुषमा अंधारेंनी फलटण शहर पोलिस ठाण्यावर सोमवारी मोर्चा काढला. त्यावेळी एसपी तुषार दोशी भेटले नसल्याने अंधारे आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला.दरम्यान, डीवायएसपी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी चर्चा केली. सुषमा अंधारेंनी त्यावेळी अनेक मुद्द्यांवरून पोलिसांच्या तपास पद्धतीवर शंका उपस्थित केली. पोलिसांवर आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही. फलटण पोलिस ठाणे हे परळीपेक्षाही भयानक असे पोलिस ठाणे बनले असून, येथील ते कोणाच्यातरी दबावाखाली काम करत आहे. पोलिसांच्या तपासातून पीडितेला न्याय मिळणार नाही. यासाठी एसआयटी एका व्यक्तीची नव्हे, तर तीन चार व्यक्ती त्यामध्ये असाव्यात. त्याहीपेक्षा निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत याची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
सुषमा अंधारेंनी या प्रकरणातील तपासासंबंधी पोलिसांकडे माहिती मागितली. त्यावेळी अशी माहिती उघड करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. हाच धागा पकडत अंधारेंनी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावरच प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, ‘जर ही माहिती जाहीर करता येत नाही असं असेल तर रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचे चॅट कसं जाहीर केलं? त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही? तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्यहनन केलं का? ‘फलटण पोलीस ठाणे छळ छावणी झाली आहे. माझा आक्षेप पोलिस अधीक्षक तुषार दोशींवर आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते अंतरवाली सराटीतही केले. त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘या प्रकरणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही त्या महिलेचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. तिचे चॅट समोर आणण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे कोण तीस मार खान? जयकुमार गोरेने आधी स्वतःचं चारित्र्य बघावं. चाकणकरबाई चारित्र्य ठरवणार का? त्यांनी आधी स्वतःचं चारित्र्य तपासावं. तपासातील गोष्ट जर तपास अधिकारी बोलू शकत नाहीत तर मग चाकणकर त्या गोष्टी कशा काय बोलू शकतात? गोरे आणि चाकणकर याना कायदेशीर नोटीस पोलिस प्रशासन देणार का ? डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे दोन पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ यांच्यावर आरोपपत्र का दाखल केलं नाही. असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला. या लोकांना डिपार्टमेंट वाचवत आहे का ? असेही सुषमा अंधारे यांनी विचारले. मुळात ज्या पोलिसांवर आरोप आहे किंवा संशय आहे त्यांची नावंच आरोपपत्रात नसेल तर मुलीच्या कुटुंबाच्या जबाबाला काहीच अर्थ नाही, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल करून त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सुषमा अंधारे म्हणाल्या, आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमल्याचे म्हटले जात होते. मात्र ती एसआयटी नसून तेजस्वी सातपुते यांची केवळ गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. हा लढा कोणत्याही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका माणसासाठी दिलेला आहे असेही त्या म्हणाल्या.
अॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, ज्या राजाने शत्रूची सूनही सन्मानाने परत पाठवली त्या छत्रपतींच्या राजधानीत प्रशासकीय पातळीवर काम करणारी आमची कन्या सुरक्षित नसावी ही एक खेदजनक घटना आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही जिल्हा न्यायाधीशांना भेटलो. न्यायाधीशांनी मी यात काय मदत करणार, असे म्हटले. ठामपणे म्हणणं मांडणारा महिला आयोगही मृत्यू पश्चात चारित्र्यहनन करतोय. जोपर्यंत पिढीतील न्याय मिळणार नाही तोपर्यंत या लढ्यात कायम सहभाग राहील, असेही त्या म्हणाल्या.