Pandharpur News | 'या पंढरपुरात काय वाजतं गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं'; श्री विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा उत्साहात

Vitthal Rukmini Shahi Vivah | भाविकांच्या उपस्थितीत वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर विवाह सोहळा संपन्न
Vitthal Rukmini Shahi Vivah
मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला.Pudhari
Published on
Updated on

Vasant Panchami Pandharpur

सुरेश गायकवाड

पंढरपूर :

'या पंढरपुरात काय वाजतं गाजत,

सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं'!!

असे म्हणत वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा परंपरेनुसार श्री विठ्ठल सभा मंडप येथे आज (दि. 23) दुपारी १२ वाजता संपन्न झाला.

असा पार पडला विवाह सोहळा

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी च्या लग्नाची लगीन घाई सुरू झाली. विठ्ठल मंदिरातील विठ्ठल सभा मंडप सजवण्यात आला होता. तर मंदिरातही आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. एरवी टाळ मृदुंगाच्या व विठ्ठल रुक्मिणी च्या नामघोषणे गजबजनाऱ्या मंदिरात सकाळ पासून सनई चौघडे, मंगल अक्षता याचबरोबर वऱ्हाडी मंडळी यांची लगबग सुरु होती. मंदिरात व मंदिराबाहेर अक्षता घेऊन देवाचे लग्न लावण्यासाठी हजारो वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती.

Vitthal Rukmini Shahi Vivah
Pandharpur News | विठ्ठल–रूक्मिणीचा 23 जानेवारीरोजी शाही विवाह सोहळा: मंदिर समितीकडून जय्यत तयारी

सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेला शुभ्र वस्त्र तसेच श्री.रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने, नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते. श्री. रुक्मिणी मातेच्या गर्भागृहातून गुलाल श्री.विठ्ठलाकडे नेण्यात आला. तिथे गुलालाची उधळण केल्यानंतर श्री विठ्ठलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला. तिथेही गुलालाची उधळण करण्यात आली.

औसेकर महाराज यांनी मंगलाष्टका म्हटली

दुपारी 12 वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची अलंकाराने सजवलेली उत्सवमूर्ती या विवाह सोहळय़ाच्या ठिकाणी म्हणजे श्री.विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजविण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आली. दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या गेल्या. यानंतर अंतरपाट धरले आणि मंगलाष्टकास सुरवात झाली. त्यामध्ये मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगलाष्टका म्हटली. मंगलाष्टक झाल्यावर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला.

Vitthal Rukmini Shahi Vivah
New Year celebration Pandharpur: नववर्षानिमित्त श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर आकर्षक फुलांनी सजले

यावेळी वऱ्हाडी मंडळी यांनी विवाह सोहळा संपन्न होताच टाळ्या वाजवत , या पंढरपुरात काय वाजतं गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं, या गाण्यावर ठेका धरला. त्यामुळे लग्न स्थळी वातावरण अगदीच आनंदिमय झाले.

यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ॲड. माधवीताई निगडे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, डॉ. प्रणिता भालके, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख पृथ्वीराज राऊत, संजय कोकीळ, अतुल बक्षी व राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.

Vitthal Rukmini Shahi Vivah
Pandharpur Temple News | विठ्ठल मूर्तीच्या चरणाची होऊ लागली झीज

भोजनाची व्यवस्था

यावेळी मंदिर समितीमार्फत संत तुकाराम भवन व विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे वऱ्हाडी मंडळी यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विवाह सोहळा पार पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. सायंकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी च्या रथातून विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्ती ठेवून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news