

सुरेश गायकवाड
पंढरपूर: नववर्षाच्या प्रारंभानिमित्त आज गुरुवारी (दि.1 जानेवारी) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या फुलांच्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत आहे. दर्शनासाठी आलेल्या लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या सजावटीसाठी ऑर्किड, लिव्हडेजी, ड्रॅसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची सुमारे एक टन फुले वापरण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी दिली.
ही संपूर्ण फुलांची सजावट विठ्ठल भक्त श्री. प्रदीपसिंह ठाकूर (रा. आळंदी देवाची, पुणे) यांनी सेवाभावी वृत्तीने मोफत करून दिली आहे. यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले. श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल चौखांबी व सोळाखांबी, श्री रुक्मिणी चौखांबी आदी प्रमुख ठिकाणी ही फुलांची आरास करण्यात आली आहे.
नववर्षानिमित्त मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर समितीमार्फत आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भाविकांना जलद व सुलभ दर्शन मिळावे यासाठी टोकन दर्शन पास बुकिंग व्यवस्था तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून, व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पूजेची संख्या कमी करणे तसेच इतर अनुषंगिक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.
दरवर्षी महत्त्वाचे सण, उत्सव व विशेष दिवसांच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास व सजावट करण्यात येते. नववर्षाच्या स्वागतासाठी मंदिर फुलांनी सजले असून, या आकर्षक सजावटीमुळे विठुरायाचे सावळे साजिरे रूप अधिकच खुलून दिसत आहे.
नववर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी, या भावनेतून हजारो भाविक श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच दर्शन रांगेत भाविकांची गर्दी असून, विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. या फुलांच्या सजावटीमुळे दर्शन घेताना भाविक अधिक समाधान व भक्तिभाव अनुभवत असल्याचे दिसून येत आहे.