पंढरपूर : जमिनीच्या वादातून दुचाकीला पिकअप धडकवली; एक ठार, एक जखमी

file photo
file photo

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा जैनवाडी (ता : पंढरपूर) येथील ज्ञानोबा जाधव व तुकाराम जाधव यांच्यामध्ये शेतीच्या वादातून कोर्टात केस सुरू आहे. त्याचा रोष मनामध्ये धरून पीकअप मधून घराकडे येत असताना घटनेतील संशयीतांनी सुग्रीव ज्ञानोबा जाधव व महेश ज्ञानोबा जाधव यांच्या मोटार सायकलला पाठीमागून जिवे मारण्याच्या उद्देशाने जोराची धडक देत फरफटत नेले. या घटनेतील मोटासायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एकजण सोलापूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

सुग्रीव ज्ञानोबा जाधव असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्याचे नाव आहे, तर महेश ज्ञानोबा जाधव असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या घटनेची फिर्याद ज्ञानोबा नामदेव जाधव (वय: ६८) रा. जैनवाडी (ता : पंढरपूर) यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, फिर्यादी ज्ञानोबा नामदेव जाधव यांची जैनवाडी शिवारात शेती गट नंबर 121, 119 असा शेती गट असून, त्याच्या वाटणीबाबत फिर्यादी व त्याचा भाऊ तुकाराम जाधव यांचा वाद चालू आहे. या शेतीच्या वादातूनच त्यांच्या फौजदारी तसेच दिवाणी स्वरूपाचा वाद आहे. त्यांच्या परस्परविरुद्ध चालू असलेल्या फौजदारी केसच्या तारखा कोर्टात चालू आहेत. सदर तारखेला बुधवारी यातील फिर्यादीची मुले महेश जाधव व सुग्रीव जाधव हजर राहून मोटरसायकलवर पंढरपूर येथून गावी जैनवाडी येथे परत येत होते. असे असताना महेश जाधव चालवत असलेल्या व पाठीमागे सुग्रीव जाधव बसलेल्या मोटरसायकल क्र. MH 13- EQ 5875 ला त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पिकअप क्र. MH 12 QW 8597 चा चालक नामे अंकुश तुकाराम जाधव व त्यांच्यासोबत असलेले संतोष तुकाराम जाधव, सचिन मनोहर लिंगडे सर्व रा. जैनवाडी (ता. पंढरपूर) यांनी संगणमताने त्यांचा पाठलाग करून निर्जन ठिकाणी आल्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अचानक मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. त्‍यामुळे मोटरसायकल रस्त्यावर पडली. त्याच स्थितीत मोटार सायकल अंदाजे 100 ते 150 मीटर फरफटत नेली. यामध्ये खाली पाडून त्‍यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या मदतीला लोक येत आहेत हे पाहून ते पळून गेले, अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

या फिर्यादीवरून रात्री उशिरा पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणेत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. सदर घटनेतील दोन संशयीत आरोपी संतोष जाधव, सचिन लिंगडे या दोघांना ताब्यात घेतले असून, एकजण फरार आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे व ग्रामीण पोलीस हे करीत आहेत. सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी भेट देवून पाहणी केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news