

पंढरपूर : ‘अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर’अशा संतोक्तीची प्रचिती देत असलेला तीर्थक्षेत्र पंढरपूरचा कार्तिकी एकादशीचा सोहळा आज रविवार (दि. 2) रोजी लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत 6 लाख भाविक दाखल झाले आहेत. यंदा पाऊसमान चांगले झाले असल्याने राज्यभरातून आलेल्या वैष्णवांमुळे पंढरी भाविकांनी गजबजली आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा पहाटे 2.20 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्य तसेच खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत.
पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेकरिता एसटी, रेल्वे, खासगी वाहनांची तसेच दिंड्यांबरोबर लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. दशमी दिवशी चंद्रभागा वाळवंट, 65 एकर, मंदिर परिसर, स्टेशन रोड, भक्तिमार्ग, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेला आहे. दर्शन रांग मंदिरापासून पत्राशेडच्या बाहेर गोपाळपूर रस्त्यावर दशमी दिवशी गेली आहे. मंदिरापासून सुमारे 5 किमी अंतरावर दर्शन रांग पोहोचली आहे. दर्शन रांगेत दिड लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहेत. तर 65 एकर भक्तीसागरात 3 लाख भाविक वास्तव्य करत आहेत. येथील तूंब, राहुट्यांमध्ये भजन, किर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले आहेत.
परतीच्या पावसाने व अतिवृष्टीने शेतकर्यांचे नुकसान झाले असले तरी यंदा कार्तिकीला भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढली आहे. त्यामुळे दर्शन रांग पाच किमी अंतरावर पोहोचली आहे. दर्शन रांगेतील भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी किमान 10 ते 11 तासाचा कालावधी लगात आहे. एका मिनीटाला साधारणपणे 35 ते 40 भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळत आहे. तर मुख दर्शन रांगही मंदिरापासून विठ्ठल अन्नक्षेत्रापासून पुढे संभाजी महाराज पुतळा ते काळा मारुती पर्यंत दर्शन रांग पुढे सरकली आहे. मुख दर्शनासाठी देखील किमान चार तासाचा कालावधी लागत आहे. भाविकांच्या उपस्थितीने शहरातील व उपनगरातील मठ, मंदिर, भक्त निवास हाऊस फुल्ल झाली असून भाविक भजन, किर्तन करण्यात दंग असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चंद्रभागेत मुबलक पाणी असल्यामुळे भाविकांना स्नान करता येत आहे. तर या ठिकाणी अनूचित प्रकार घडू नयेत म्हणून जीवरक्षक दलाच्या स्पीड बोटी तैनात करण्यात आलेल्या आहेत. 3 हजार 57 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर 300 हून अधिक सीसीटिव्ही कॅमेर्यांची करडी नजर भाविकांवर आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी नामदेव पायरीकडे येणार्या भाविकांमध्ये विठुमाऊलीच्या नामाचा उत्साह दिसून येत आहे. वारकर्यांमध्ये उत्साह, नवचैतन्य संचारल्याचे दिसून येत आहे.
कार्तिकी यात्रा एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी 6 वाजता आलेल्या पावसाने भाविकांसह व्यापारी, दुकानदार, फेरीवाले यांची तारांबळ उडाली. गर्दीने भरलेले रस्ते रिकामे दिसू लागले. रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरू राहिल्याने भाविक, व्यापारी यांना त्रास सहन करावा लागला.