Pandharpur News: अन्यथा सरकारच्या विरोधात वारकरी संप्रदायाचा प्रचार

पंढरपूर कॉरिडॉरविरोधी सभेत महाराज मंडळींचा इशारा; नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर तापले वातावरण
Pandharpur News: अन्यथा सरकारच्या विरोधात वारकरी संप्रदायाचा प्रचार
Published on
Updated on

पंढरपूर : पंढरपूर कॉरिडॉर हा भाविकांसाठी, विकासकामासाठी नसून पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोनातून राबविण्याचे नियोजन शासन व प्रशासन करीत आहे. परंतु या विरोधात संपूर्ण राज्यात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आवाज उठविणार आहे. प्रसंगी सत्ता बदलासाठी प्रचारदेखील करणार असल्याच्या तीव्र भावना कॉरिडॉर विरोधात आयोजित सभेमध्ये विविध महाराज मंडळींनी व्यक्त केल्या आहेत. कॉरिडॉरला विरोध केल्याने नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.

प्रस्तावित पंढरपूर कॉरिडॉर तसेच डीपीला विरोध करण्यासाठी येथील संभाव्य बाधितांच्या वतीने स्थापित समितीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारी सायंकाळी सभेचे आयोजन केले होते. यास नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष वडगावकर महाराज होते. व्यासपीठावर शिरवळकर महाराज, संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. महेश महाराज देहुकर, शंकर महाराज गलगलकर, रामकृष्ण महाराज वीर, कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर, डॉ. प्राजक्ता बेणारे, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, व्यंकटेश गलगलकर, ॲड. आशुतोष बडवे, सुमित शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना देहुकर महाराज म्हणाले की, वारकरी, महाराज मंडळींनी मोठ्या श्रध्देने आपल्या परंपरा टिकवल्या. मात्र याचा मोबदला म्हणून थेट आमच्या मठांवर घाला घातला जाणार असेल तर आम्ही आक्रमकपणे या विरोधात राज्यभर प्रचार करू, असा इशारा दिला. याचप्रमाणे वडगावकर महाराज, शिरवळकर महाराज व वीर महाराज यांनीदेखील हा अन्यायकारी कॉरिडॉर भाविकांसाठी नाही, तर व्यावसायिक फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप केला. वारकऱ्यांसाठी आवश्यक विकासकामे करण्यापेक्षा ज्याची मागणी नाही तो कॉरिडॉर का लादला जात आहे? असा प्रश्न केला. सरकार आमच्या भावनांशी, श्रध्देशी खेळत असेल तर हे सरकार पाडण्यासाठी आम्हाला गावागावात प्रचार करावा लागेल, असा इशारादेखील महाराज मंडळींनी दिला.

तीर्थक्षेत्र बचाव कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इचगावकर यांनी, बालिश बुद्धीचे राज्यकर्ते प्रत्येक तीर्थक्षेत्राला एकाच तराजूत तोलत आहेत, असा आरोप केला. आम्ही शासनाला शहरातील अनेक मोकळ्या जागा दाखविल्या आहेत. 200 एकर जागा विना वापर पडून असल्याचा दावा करून येथे कॉरिडॉर राबवावा, अशी मागणी केली. यावेळी बाबाराव महाजन, वैभव बडवे, आशिष राजहंस, अनिल जुमाळे, ॲड. विनायक उंडाळे, बालाजी महाजन, सुलभा वट्टमवार आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सभेस महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news