

व्यासनारायण, अंबाबाईनगर झोपडपट्टीत शिरले पाणी
संतपेठेत पाणी शिरण्याची भीती
पंढरपूर : वीर व उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीला पूर आला आहे. चंद्रभागा नदी इशारा पातळी ओलांडून धोकादायक पातळीवर वाहत आहे. सध्या उजनी धरणातून एक लाख 67 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. याअगोदर सोडलेला विसर्ग पंढरपुरात आला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून पंढरपुरात एक लाख 40 हजार क्युसेकचा विसर्ग आहे. संगम येथे एक लाख 95 हजारांचा विसर्ग सुरू आहे.
हा विसर्ग पंढरपुरात रात्री दाखल होणार असल्याने व्यासनारायण झोपडपट्टीबरोबर अंबाबाई पटांगण नगर झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. तर संत पेठ येथील आंबेडकर नगरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून 137 संभाव्य बाधित कुटुंबांचे स्थालांतर करण्यात आले. आणखी 100 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
चंद्रभागा नदीला पूर आल्याने व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरले. त्यामुळे येथील 80 कुटुंबांचे स्थलांतर दुपारीच करण्यात आले. येथील 400 पेक्षा जास्त लोक त्यांच्या सोईने इतरत्र त्यांच्या पै पाहुण्यांसह नातेवाइकांच्या घरी तसेच स्वत:च्या इतरत्र असलेल्या घरी स्थलांतरित झाले. अंबाबाई नगरातील 57 कुटुंबांना स्थालांतरीत करण्यात आले. या स्थलांतरित कुटुंबातील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालय परिसरातील रायगड यात्री भवन येथे स्थलांतरित करण्यात आले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
चंद्रभागान नदीवरील सर्वच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गोपाळपूर येथील पंढरपूर मंगळवेढा रोडवरील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. रात्री उशिरा गोपाळपूर येथील नवीन पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा वाहतूक बंद होणार आहे. ही वाहतूक टाकळी बायपास मार्गे वळवावी लागणार आहे. त्यानुसार प्रशासन कामाला लागले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मार्गावरील गोपाळपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला. नवीन पूलही रात्री उशिरा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पंढरपूर ते जुन्या अकलूज मार्गावर देखील पाणी आल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे.
चंद्रभागा नदीला पूर आल्याने व्यासनारायण झोपडपट्टी व अंबाबाईनगरात पाणी शिरले. त्यामुळे व्यासनारायण येथील 80, तर अंबाबाई पटांगण येथील 57 अशा 137 कुटुंबांना गुरुवारी दुपारपर्यंत स्थालांरित करण्यात आले. रात्री आणखी या दोन्ही ठिकाणच्या 100 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. - सचिन इथापे, प्रांताधिकारी
उजनीतून विसर्ग : 1,67,000 क्युसेक
पंढरपुरातील विसर्ग : 1,40,000 क्युसेक (वाढण्याची शक्यता)
स्थलांतरित कुटुंबे : 137 (80 व्यासनारायण, 57 अंबाबाईनगर)
नियोजित स्थलांतर : 100 कुटुंबे
प्रभावित भाग : व्यासनारायण, अंबाबाईनगर, संतपेठ
मदत कार्य : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भोजन व्यवस्था