

पंढरपूर : व्यवसायासाठी खासगी सावकारांकडून घेतलेले पैसे, व्यवसायात आलेला तोटा यामुळे आर्थिक विवंचनेला कंटाळून चप्पल व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाखरी येथे घडली आहे. मयताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीच्या आधारे 7 जणांविरूद्ध खासगी सावकारकीसह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश मारूती कांबळे (वय 64, रा. वाखरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पंढरपूर शहरात सुरेश कांबळे यांचे ‘दिनेश फूटवेअर’ नावाचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. दोन मुले आणि मुलीचे लग्न झाल्याने ते बाहेरगावी असतात. घरी सुरेश व पत्नी शकुंतला कांबळे हे दोघेच वास्तव्यास आहेत. शकुंतला कांबळे यांची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली आहे. शुक्रवारी सकाळी सुरेश कांबळे हे पत्नीला अंघोळीसाठी पाणी ठेवल्याचे सांगून बाहेर गेले. त्यानंतर शकुंतला या अंघोळ, स्वयंपाक करून हॉलमध्ये बराचवेळ बसल्या.
मात्र, पती येत नसल्याने त्यांनी मुलांशी मोबाईलवरून संपर्क केला. काही वेळाने मुलाचा एक मित्र घरी आला व त्याने वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता, सुरेश कांबळे यांनी लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी मयत सुरेश कांबळे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. त्यात व्यवसायाची परिस्थिती बिकट झालेली असून, खासगी सावकारांचे 6 टक्के व्याजाने पैसे घेतले आहेत. फिरवाफिरवी करून नैराश्य आले आहे. त्यातून टोकाचे पाऊल उचलल्याचे नमूद आहे.
तसेच संबंधित खासगी हे जातिवाचक शिवीगाळ करून, धमक्या देत त्रास देत होते, असे त्यामध्ये नमूद केले आहे. संबंधित सावकारांवर कारवाई करावी, असेही चिट्टीत लिहिले आहे. चिठ्ठीतील मजकुरानुसार भारत हिलाल, विकी अभंगराव, शिवाजी गाजरे, बंडू भोसले, काशी ज्वेलर्सचे बापू गायकवाड, संजय व्यवहारे व इरफान अशा 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.