Pandharpur News : ऊस दरासाठी भीमानगरमध्ये शेतकरी संघटनेचा रास्ता रोको

पंढरपुरात ऊस वाहतूक रोखली : टायर फोडण्याचा इशारा
Pandharpur News
ऊस दरासाठी भीमानगरमध्ये शेतकरी संघटनेचा रास्ता रोको
Published on: 
Updated on: 

पंढरपूर/ टेंभुर्णी : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर जाहीर करावा, साखरेची एमएसपी ५० रुपये तर इथेनॉलचा दर ७० रुपये प्रतिलिटर निश्चित करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी दुपारी सोलापूर-पुणे महामार्गावरील भीमानगर (ता. माढा) येथे सुमारे अडीच-तीन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोकोमुळे दहा ते बारा किलोमीटर लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, शेतकरी, कार्यकर्त्यांनी पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूरमध्ये विठ्ठल कारखान्याकडेही जाणारी ऊस वाहतूक रोखली.

उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य उसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, बेकायदेशीर ऊस वाहतूक त्वरित बंद करावी, साखर उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा न्याय्य वाटा शेतकऱ्यांना मिळावा, अशी जोरदार मागणी आंदोलकांनी उचलून धरली. ऊस दर निश्चित करताना साखरेचा विक्री दर आणि इथेनॉलसह इतर अन्य उपपदार्थांपासून मिळणारे उत्पन्नाचा समावेश व्हावा, साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करून उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऊस दर जाहीर केल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.

आंदोलनस्थळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, अमरसिंह कदम, तानाजी बागल, सिद्धेश्वर घुगे, प्रताप पिसाळ, सचिन पाटील, चंद्रकांत कुटे, प्रताप गायकवाड, बापू गायकवाड, शेतकरी, कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूरमध्ये शेतकरी संघटनांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडविले. जोपर्यंत ऊस दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत ऊस वाहतूक करू नका; अन्यथा ट्रॅक्टरचे टायर फोडले जातील, असा इशारा दिला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे आंदोलन करण्यात आले. यावेळी दीपक भोसले, समाधान फाटे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news