

Pahalgam Terror Attack
टेंभुर्णी : - जम्मू काश्मीर येथील पहेलगाम येथे यात्रेकरूवर अतिरेक्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे अडकून पडलेले माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील ४७ यात्रेकरू आज सुखरूपपणे आपल्या गावी परतले आहेत.यामुळे यात्रेकरु व त्यांच्या कुटुंबीयांनी अखेर तीन दिवसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
पहलगाम येथील अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्यात २८ यात्रेकरूंची निर्घृण हत्या झाली होती. तर शेकडो यात्रेकरू या हल्ल्यामुळे काश्मिरात अडकून पडले होते. यामुळे सर्व यात्रेकरू व त्यांचे कुटुंबीय ही तीन दिवस दहशतीखाली होते. यामध्ये माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील ४७ यात्रेकरूचा समावेश होता. यावेळी माजी आमदार बबनराव शिंदे व मा.आ.संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तसेच केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला. जिल्ह्याधिकारी कुमार आशीर्वाद हेही सतत संपर्कात होते. यामुळे सर्व यात्रेकरूना मुंबई पर्यंत विमानाने व तेथून लक्झरी बसने सुखरूपपणे आणण्यात यश आले. यात्रेकरूंनी गावी आल्यानंतर शिंदे यांची निमगाव येथे जाऊन भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानले. यावेळी गावातील संजय डांगे, सतीश पाटील, बिभीषण डांगे,हनुमंत जाधव,नितीन भोगे,अड दीपक लोंढे, उपस्थित होते
फोन व मेसेजच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सतत संपर्कात होतो. केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने विमान प्रवासाची सोय केली आहे. अडचणीच्या वेळी मदत करणे हे आपले माणुसकीच्या भावनेतून कर्तव्य आहे. जेवढी मदत करणे शक्य आहे तेवढी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
माजी आमदार बबनराव शिंदे