Pahalgam Terror Attack: काश्मीरमधून 29 एप्रिलपर्यंत 546 पर्यटक परतणार; सर्व पर्यटक सुरक्षित
पुणे: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. शुक्रवारपर्यंत 657 जणांनी कक्षास संपर्क केला असून यातील 546 प्रवासी 29 एप्रिलपर्यंत जिल्ह्यात परत येणार आहेत.
नियंत्रण कक्षाकडे विचारणा केलेल्या सर्व पर्यटकांशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली. शुक्रवार पर्यंत 546 पर्यटकांशी संवाद झाला आहे.
हे सर्व प्रवासी 29 एप्रिलपर्यंत रेल्वे आणि विमानाच्या माध्यमातून परत येणार आहेत. सध्या येथील परिस्थिती शांत असल्याने पर्यटकांमध्ये भीती कमी झाली आहे. अनेकांचे पुढच्या तारखेचे रेल्वेचे तिकीट असून ते लवकर करता येईल का अशी विचारणा केली जात आहे.
तर शनिवारी (दि. 26) 44 पर्यटक विमानाने आणि 51 पर्यटक रेल्वेने येणार आहेत. रविवारी (दि. 27) 11 प्रवासी विमानाने व 39 पर्यटक रेल्वनेे येणार आहेत. याचबरोबर 30 प्रवासी वाहनाने येणार आहेत.
सोमवारी (दि. 28 ) आणि मंगळवारी (दि. 29) 18 प्रवासी रेल्वे आणि विमानाने येणार आहेत. नियंत्रण कक्ष सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून पर्यटकांकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. शुक्रवारपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या 657 पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास संपर्क साधला असल्याचे बनोटे यांनी सांगितले.

