सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविली आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (दि. 21) कांद्याला प्रतिक्विंटल पाच हजार 700 रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे शेतकर्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शनिवारी बाजार समितीमध्ये 227 ट्रक कांद्याची आवक झाली आहे. सर्वाधिक दर हे साडेपाच हजारांपेक्षा जास्त मिळाला आहे. तर सरासरी दर चार हजार रुपये प्रतिक्विंटल मिळत आहे. सर्वात कमी दर एक हजार रुपये मिळत असल्याने शेतकर्यांचा सर्व कांदा विक्री होत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी झाली होती.
मात्र निर्यातबंदी उठविल्यानंतर कांद्याला चांगला दर मिळत असल्याने गेल्या आठ दिवसांपासून आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बाजार समितीमध्ये 20 हजार 622 क्किंटल कांद्याची आवक झाली आहे. तरीही कांद्याचे भाव वाढले आहेत.
बाजार समितीमध्ये नवा आणि जुना कांदा विक्रीसाठी येत आहे. नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, बार्शी तालुक्यातून जुना कांदा येत आहे. तर कर्नाटक, म्हसवड, फलटण, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट येथून अल्प प्रमाणात नव्या कांद्याची आवक होत आहे.