

भिमानगर :- उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरु असलेल्या विसर्गा मध्ये वाढ करून रविवारी दिनांक २७ जुलै २५ रोजी दुपारी १२:०० वाजता ५० हजार क्यूसेक्स एवढा वाढवला. तर रविवारी रात्री ७:०० वाजता वीर धरणातुन निरा नदी पात्रात सुरू असलेल्या विसर्गात वाढ करून २३ हजार क्यूसेक्स इतका करण्यात आला आहे. उजनी धरण व वीर धरणाचा दोन्हीं मिळून ७३ हजार क्युसेक्सने संगम येथून पुढे भिमानदी पात्रात विसर्ग आहे. सदर विसर्गामध्ये आवश्यकते नुसार वाढ होण्याची शक्यता आहे. असे कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग, फलटण व उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले.
चालू वर्षात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कधी नव्हे ते उजनी धरण मे जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले, परंतु पूर परिस्थिती ओळखून प्रशासनाने भीमा नदीत पाणी सोडून पाण्याचा समतोल राखण्यात प्रयत्न केला. गेल्या दोन दिवसांपासून उजनी पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर वाढल्याने उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ होऊन दौंड येथून ४१ हजार क्युसेक्सने उजनी धरणात पाणी येत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्रातील बंद केलेला विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला.
शुक्रवार दि.२५ जुलै सायंकाळी ९ वाजता ५ हजार क्युसेक्सने विसर्ग भिमा नदी पात्रात सोडण्यात सुरवात झाली. नंतर रात्री १२ वाजता त्यात वाढ करून १० हजार क्युसेक्स, शनिवारी दिनांक २६ जुलै रोजी दुपारी ३:०० वाजता १५ हजार क्यूसेक्स एवढा विसर्ग केला. रविवारी दि.२७ जुलै ला सकाळी १० वाजता ४० हजार क्युसेक्स तर दुपारी १२ वाजता ५० हजार क्युसेक्सने भिमानदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. तर वीर धरणातुन निरा नदी पात्रात २३७३५ क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला असून संगम येथून पुढे भिमानदी पात्रात ७३ हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.
उजनी धरणातील एकूण साठा सध्या ११५.७० टीएमसी इतका आहे. उपयुक्त पाणीसाठा ५२.०४ टीएमसी असून ९७.१३ टक्के धरण भरले आहे. चालू वर्षात धरण भरून येण्याचा वेग मागील वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलविण्यात यावेत. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. असे धरण व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.
दि.27/07/2025, सायं. 6:00 वा.
एकूण पाणी पातळी:- 496.700 मी
एकूण पाणीसाठा:- 115.70 टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा:- 52.04 टीएमसी
टक्केवारी:- + 97.13 टक्के
दौंड विसर्ग- 41688 क्युसेक्स
कालवा - 1100 क्युसेक्स
बोगदा - 400 क्युसेक्स
सीनामाढा - 180 क्युसेक्स
दहीगाव - 80 क्युसेक्स
वीजनिर्मिती - 1600 क्युसेक्स
भीमा नदी - 50000 क्युसेक्स