

सोलापूर : पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता 16 हजार 600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भीमा नदीचे पात्र पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या तीन दिवसांपासून सर्वत्र हजेरी लावली आहे. उजनी आणि वीर धरणाच्या माथ्यावर पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. नदीपात्रात कोणीही उतरू नये, सखल भागातील संबंधित नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे यांनी केली आहे.
दरम्यान, वीर धरणातील पाणीसाठा व पाण्याची आवक लक्षात घेऊन या धरणात 92 टक्के पाणीसाठा नियंत्रित करण्यात आला आहे. त्याशिवायचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भीमा आणि निरा नदीच्या तीरावरील शेतकर्यांनी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गुरुवारी (दि. 24) उजनीतून वीज निर्मिती प्रकल्पासाठी 1600 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.
शुक्रवारी (दि. 25) त्यात वाढ करून विसर्ग पाच हजार क्युसेक, तर रात्री 12 वाजता दहा हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
शनिवारी (दि. 26) दुपारी तीन वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदी पात्रात वीजनिर्मितीसाठी 1600 क्युसेक आणि सांडव्यातून 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.