पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : माजी आ. प्रशांत परिचारक यांचे समर्थक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. या घटनेमुळे पंढरपूरच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. भोसले गट पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात महत्वाचा मानला जातो. त्यामुळे परिचारक यांच्यासाठी नागेश भोसले यांचे बंड अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
माजी आ. प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक, मर्चेंट बँकेचे माजी अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व मर्चंट बँकेचे विद्यमान संचालक नागेश भोसले, नगराध्यक्ष साधनाताई भोसले राष्ट्रवादी पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, संजय बाबर, धीरज डांगे, बजरंग पवार, सरपंच गिरीश पवार, सुनील मोहिते, अभय भोसले, पृथ्वीराज भोसले, श्रीराज भोसले, पिंटू भांगे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
परिचारक हे सध्या भाजपमध्ये आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष किंवा राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्याची चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भोसले यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याने परिचारक गटात अस्वस्थता पसरली आहे.