

Solapur Ganeshotsav news
पोखरापूर : मोहोळ येथील मोरया गणेशोत्सव मंडळात असताना २४ वर्षीय तरुणाला अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले असता, तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. १९) रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. अनुराग नामदेव पवार, असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास अनुराग नामदेव पवार (रा. जुनी नेताजी शाळा, वडर गल्ली, मोहोळ, ता. मोहोळ) हा मोहोळ येथील मोरया गणपती मंडळात असताना त्यास अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडला. तेथील तरुणांनी त्याला तात्काळ विघ्नहर्ता हॉस्पिटल, मोहोळ येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी त्याचा चुलत भाऊ आकाश धर्मा पवार यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात घटनेची खबर दिली असून, त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतनाथ माने करीत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण मोहोळ शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून, मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात तरुणांनी मोठी गर्दी केली होती.