Solapur News : गणेशोत्सवात गावागावांतून पारंपरिक खेळांना मिळतेय प्राधान्य

मोबाईल आणि ऑनलाईन मनोरंजनाऐवजी लेझीमद्वारे तरूणाईचा जल्लोष
Solapur News
गणेशोत्सवात गावागावांतून पारंपरिक खेळांना मिळतेय प्राधान्य
Published on
Updated on

मदन चवरे

माढा : मोबाईल आणि ऑनलाईन मनोरंजनाच्या युगात शाळकरी मुले तसेच तरुणांचा मोठा वेळ स्क्रीनवर जात आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या निमित्ताने यंदा माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पारंपरिक खेळांना पुन्हा उजाळा मिळत असून, लेझीमच्या तालावर तरुणाई मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. गाण्याच्या तालावर शिस्तबद्ध कवायती सादर करताना मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उंदरगाव आणि उपळाई बुद्रुक येथे लेझीमच्या खेळाला विशेष प्रतिसाद मिळत असून, मोठ्या संख्येने तरुण व शाळकरी मुले त्यात सहभागी होत आहेत. एकसुरात होणाऱ्या हालचाली, गाण्याचा निनाद आणि खेळातील चपळाई यामुळे ग्रामस्थांचे लक्ष वेधले जात आहे.

तालुक्यात सध्या दुष्काळाचे सावट आहे. गेल्यावर्षी अनेक भागांना पूरस्थितीचाही सामना करावा लागला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही गावागावांत उत्साहाने सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महिलांसाठी पैठणीचा खेळ, संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, विविध प्रदर्शनांसह मनोरंजनात्मक उपक्रम घेतले जात आहेत. युवकांकडे व्यवस्थापनाची जबाबदारी असते. यंदा या पद्धतीत काहीसा बदल झाल्याचे दिसत आहे. मंडळांनी युवकांना केवळ व्यवस्थापनापुरते मर्यादित न ठेवता सांस्कृतिक व शारीरिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लेझीमचे पथक तयार करून सराव व सादरीकरण केले जात आहे.

आजच्या काळात व्यसनांचे वाढते प्रमाण आणि मोबाईलच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्याच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक खेळांमध्ये सहभागी होणारी युवा पिढी ही सकारात्मक बाब ठरत आहे. लेझीममुळे मनोरंजनासोबतच शारीरिक व्यायाम, सांघिक भावना, शिस्त आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. गेल्यावर्षीची पूरस्थिती आणि यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचे आव्हान असतानाही युवकांनी व्यसनाधीनतेकडे न वळता कला-क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांची निवड करणे समाधानकारक असल्याची भावना व्यक्त होत आहे. आभासी जगातून काही काळ बाहेर पडून मातीशी, संस्कृतीशी आणि पारंपरिक खेळांशी जोडले जाणारे हे नाते ग्रामीण समाजासाठी आशादायी चित्र निर्माण करणारे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news