

Solapur News
मोहोळ : मोहोळ तालुक्यातील चिखली गावात सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागत आहे. घरातील दैनंदिन गरजांसाठी आवश्यक असलेले पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना गावाबाहेर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “कुणी पाणी देता का पाणी...?” अशी आर्त हाक चिखलीकरांकडून प्रशासनाला मारली जात आहे.
गावातील पाण्याचे उपलब्ध स्रोत आटल्याने तसेच नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पहाटेपासूनच पाण्याच्या शोधात नागरिकांची धावपळ सुरू होत असून, पाण्याची व्यवस्था करण्यासाठी अनेकांना आपले कामधंदे बाजूला ठेवावे लागत आहेत.
पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे वेळ, श्रम आणि पैशांचा मोठा भार ग्रामस्थांवर पडत आहे. पाणी भरण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत असून, उपलब्ध पाण्यावरच कुटुंबांची तहान भागवण्याची वेळ आली आहे. गावातील पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत असताना प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा नागरिकांच्या आरोग्याशी आणि दैनंदिन जीवनाशी थेट निगडित असल्याने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.
चिखली गावातील सध्याची परिस्थिती पाहता तातडीने टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. टँकरची संख्या आणि फेऱ्या गरजेनुसार निश्चित करून प्रत्येक वस्तीपर्यंत पाणी पोचवावे, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या कारभाराबाबत नाराजी वाढत असून, संबंधित विभागाने प्रत्यक्ष गावात पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि पाणीपुरवठ्याचे ठोस नियोजन करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.