

Gopichand Padalkar on Sharad Pawar
मुंबई : शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहेत. त्यांनी दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या विश्वासार्ह संस्थेवर शंका निर्माण केली. निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. एकीकडे मंडल यात्रा आणि दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून नातू आंदोलन करतो. पवार हे आधुनिक काळातील नारदमुनीच आहेत, अशी जहरी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. मारकडवाडी येथे ते बोलत होते. यावेळी मारकडवाडी ग्रामस्थांनी देखील शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी पडळकर म्हणाले की, "शरद पवारांची दुतोंडी भूमिका आहे. षडयंत्र करून एखाद्या यंत्रणेबाबत साशंकता निर्माण करायची. चिठ्ठ्या गिळता येतात, पळवता येतात, त्यामुळे पवारांचे सहकारात प्राबल्य आहे. सहकारात जर ईव्हीएम आले तर, त्यांचे प्राबल्य संपून जाईल. म्हणून त्यांना ईव्हीएम नको तर, चिठ्ठ्या हव्या आहेत. निवडणूक हा देशाचा गाभा आहे. त्यावर षडयंत्र करून शंका घेण्यास भाग पाडणे म्हणजे, देशद्रोह आहे. शरद पवारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे."
"मारकडवाडी हे गाव देशाच्या पटलावर चर्चेत आहे. संविधानाने निर्माण केलेल्या संस्था आहेत. न्यायालय, सीबीआय, किंवा इतर संस्था या संविधान रचनेनुसार चालतात. निवडणूक ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यावर लोकांचा प्रचंड विश्वास आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाने व्यथित होऊन त्याचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्यात आले. त्याआधी लोकसभा निवडणुकीत महायुतीला काही प्रमाणात अपयश आले. त्यावेळी महायुतीचे नेते टीका टिप्पणी न करता अपयशाचा शोध घेऊन त्यावर काम केले. त्याचे परिवर्तन विधानसभा निवडणुकीत झाले. त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते हवेत होते. लोकसभा निवडणुकीत जनतेचा विजय, असे विरोधक बोलत होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर हा ईव्हीएम विजय बोलू लागले," असे पडळकर म्हणाले.
यावेळी सरपंच रणजीत मारकट म्हणाले की, "काही उदाहरणे समोर आली आहेत. लोकं निश्चित पणे मला बोलत आहेत, ४० वर्षांपासून आपले गाव विकासापासून वंचित आहे. साधा रस्ता नाही. एका महिलेने येऊन विचारले की मतदान कुणाला केले? त्या आजीने मोदी व फडणवीसांचे नाव घेतले. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलो तरी चुकीचे आहे. आपल्याला २२ कोटींचा निधी माजी आमदार राम सातपुतेंनी दिला होता. विकास करून गावाचे नाव खराब होत असल्याने आम्ही तरुण व बुजुर्ग मंडळींनी चर्चा केली. त्यानंतर गोपीचंद पडळकर यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी आमच्या गावात शरद पवार आले होते. त्यांच्या आधी त्यांची गुप्त टीम आली होती. त्यांनी काय बोलायचे हे सांगितले होते," असा आरोप त्यांनी केला.