

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यात आज (दि. ३) सकाळी ११ वाजून २२ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, याबाबतची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने एक्सवर पोस्ट करत दिली आहे. सांगोला येथे भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याची माहिती असून पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे २.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के जाणवले. दरम्यान, या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. काही दिवसांपूर्वी म्यानमार येथे मोठ्या तीव्रतेची भूकंप झाला असून सुमारे ३ हजार जणांचा बळी गेला आहे. (Solapur Earthquake)
हा भूकंप पाच किलोमीटर खोलीवर झाला आहे. याची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. सांगोला तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यामध्येही हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले जात आहे. १९९३ मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यातही भूकंप झाला होता. त्यानंतर आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात भूकंप झाला आहे. सांगोला तालुक्याच्या शेजारी असलेल्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातही हा भूकंप जाणवल्याचे सांगितले जात आहे. सांगोला हे भूकंपाचे केंद्र असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार यांनी सांगितले.
भूकंपाची तीव्रता जरी जास्त नसली तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण मागील एक-दोन दिवसांपूर्वी भारताच्या शेजारी असलेल्या म्यानमारमध्ये मोठा भूकंप झाला आहे. त्यामध्ये अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले होते. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. मात्र, नागरिक भूकंप झाल्याचे ऐकून घाबरले आहेत.