

राशिवडे : राज्यातील ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून कोल्हापूर, सोलापूर, नांदेड विभागातील सर्वच कारखान्यांनी हंगाम समाप्ती केली आहे. पुणे विभागातील तीन, अहिल्यानगरमध्ये दोन, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक, अमरावतीमध्ये एक, तर नागपूरमध्ये एक असे दोनशे पैकी आठच कारखान्यांचे गाळप सुरू आहे. राज्यात ऊस गाळप, साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर विभागच अव्वल ठरला आहे.
राज्यातील 200 साखर कारखान्यांनी एकूण 970.05 लाख टन उसाचे गाळप केले आहे. यातून 802.65 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा 9.47 टक्के आहे. विभागवार आकडेवारी अशी : कोल्हापूर विभागात सर्वाधिक 40 कारखान्यांनी 202.74 लाख टन ऊस गाळप करून 224.6 लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले. या विभागाचा साखर उतारा 11.08 टक्के आहे. पुणे विभागात 31 कारखान्यांनी 205.79 लाख टन ऊस गाळप करून 198.27 लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले. या विभागाचा साखर उतारा 9.63 टक्के आहे. सोलापूर विभागात 45 कारखान्यांनी 130.36 लाख टन ऊस गाळप करून 105.7 लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले. या विभागाचा साखर उतारा 8.11 टक्के आहे.
अहिल्यानगर विभागामध्ये 24 कारखान्यांनी 113.9 लाख टन गाळप करून 101.52 लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.91 राहिला आहे.संभाजीनगर विभागातील 22 कारखान्यांनी 80.93 लाख टन ऊस गाळप करत 8.01 उतार्याने 64.86 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नांदेड विभागातील 29 कारखान्यांनी 97.73 लाख टन गाळप करत 9.67 उतार्याने 95.43 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. अमरावती विभागातील 4 कारखान्यांनी 11.66 लाख टन गाळप करत 8.94 उतार्याने 10.42 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नागपूर विभागातील तीन कारखान्यांनी 3.68 लाख टन गाळप करत नीचांकी 5.03 उतार्याने 1.85 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
गत हंगामाच्या तुलनेत यावर्षी ऊस गाळप आणि साखर उत्पादनात घट झाली आहे. मागील हंगामात आजअखेर 994.15 लाख टन ऊस गाळप झाले होते आणि 1085.77 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. तसेच सरासरी साखर उतारा 10.23 टक्के होता.