

पुढारी ऑनलाईन डेस्क: विधानसभा निवडणुंकाच्या मतदान प्रक्रियेला आव्हान देत, सोलापूरातील मारकडवाडी या गावातील गावकऱ्यांनीच मतपत्रिकेवर मतदान प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रशासनाने दडपशाही करत ही प्रक्रिया थांबवली. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (दि.८) मारकडवाडी येथे भेट दिली. दरम्यान 'EVM हटाव, देश बचाव' या कार्यक्रमात ते सहभागी झाले.
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावात ईव्हीएम विरोधी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, "इथे येण्यापूर्वी मी ऐकले की इथल्या लोकांनी तुम्हाला मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायची आहे, अशी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. कारण तुम्हाला निकालावर विश्वास नव्हता. हे आश्चर्यकारक आहे.
मला तुम्हाला सांगायचे आहे की, तुम्ही माझ्याकडे ज्या काही तक्रारी सुपूर्द केल्या आहेत, त्या आम्ही निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठवू, असा विश्वास त्यांनी मारकडवाडीतील जनतेला दिला. तसेच या कार्यक्रमादरम्यान ईव्हीएमवर निवडणूक नको, ती मतपत्रिकेवर व्हावी, असा ठराव देखील एकमताने करण्यात आला.
पवार पुढे म्हणाले, "निवडणुका होतात... काही जिंकतात काही हरतात... पण महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. प्रक्रिया आणि मतदारांना आत्मविश्वास वाटत नाही. ईव्हीएमच्या माध्यमातून मतदार मतदानासाठी जातो आणि आत्मविश्वासाने बाहेर पडतो पण काही निकालांमुळे लोकांमध्ये शंका निर्माण झाल्याचा उल्लेख देखील या कार्यक्रमात त्यांनी केला.
"अमेरिका, इंग्लंड आणि अनेक युरोपीय देश इव्हीएमवर नव्हे तर मतपत्रिकांवर निवडणुका घेत आहेत. जेव्हा संपूर्ण जग निवडणुका मतपत्रिकेवर घेत आहेत. तर भारतात मतपत्रिकेवर, निवडणुका का नाहीत?", असा सवाल राष्ट्रवादी-एससीपी अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला केला आहे.