

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टपासून निर्णायक लढा देणार आहे. आता माघार नाही, भले राज्यातील सरकार राहिले काय अन् गेले काय आम्हाला काही फरक पडत नाही. असा निर्धार मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षण आंदोलनाविषयी वातावरण निर्माण करण्यासाठी जरांगे यांचा राज्यभर दौरा सुरू आहे. त्याअंतर्गत शनिवारी सोलापूर, वडाळा (उत्तर सोलापूर) आणि तुळजापूर दौऱ्यावर ते होते. यातिन्ही ठिकाणी विविध कार्यक्रमांत समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अंतरवली आंदोलनाने मुंबई जाम झाली की सरकारला कळ लागते. तोवर लागत नाही. आता मेलो तरी बेहत्तर पण माझ्या समाज बांधवांवर अन्याय होवू देणार नाही, असा सज्जड इशारा जरांगे यांनी तुळजापुरातील सभेत दिला. तसेच सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरण व ऐतिहासिक भित्तीशिल्पाचे उदघाटन जरांगे यांनी केले.
यानंतर सोलापुरात बोलताना जरांगे म्हणाले, आंदोलन चिरडण्यासाठी आपल्याला अटक करण्याचा किंवा आंदोलनादरम्यान दगडफेक घडवून आणण्याचा सरकारचा डाव आहे. धाराशिवच्या सीमेनंतर आपला पोलिस बंदोबस्त काढण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. २९ ऑगस्टला मोठ्या संख्येने एकत्र येऊन मराठा समाजाने आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले. उत्तर सोलापुर तालुक्यातील वडाळ्यात जाहीर सभेत जरांगे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे जेवढे आमदार, खासदार, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष आहेत, त्या सर्वांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समजून सांगण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मंत्र्यांनी केलेल्या चुका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुधाराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत, जर आमच्या सगळ्या मागण्या सरकारने मान्य केल्या तर सरकारला आम्ही दुखावणार नसल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.