

सोलापूर : आगामी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा अंदाज वरिष्ठांच्या लक्षात आणून दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ही महायुती की स्वतंत्र लढायची याबाबतचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ पातळीवरून होईल, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
पालकमंत्री गोरे यांनी सोमवार, दि. 28 जुलै रोजी सायंकाळी होटगी रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपाच्या सर्व मंडल अध्यक्षांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात रणनीती काय असावी, याबाबत मंडल अध्यक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. जिल्हा नियोजन समिती निधी वितरणबाबत चर्चा केली. येत्या काळात मंडल, तालुका, मतदार संघ स्तरावर कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळातील फेरबदलावरून अधिक बोलण्याचे टाळून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने भाजपावर काही परिणाम होणार नाही. भाजपा हे सक्षम पार्टी आहे. दोन्ही ठाकरे बंधूचा राजकीय अस्तित्वासाठी धडपड सुरू असल्याचेही गोरे म्हणाले.
पालकमंत्री यांच्या नियोजित दौर्यात आयोजित बैठकीत मंडल अध्यक्ष आणि सर्व आमदार अपेक्षित होते. परंतु आ.विजयकुमार देशमुख, आ.सुभाष देशमुख यांची अनुपस्थिती होती. यावर प्रश्न विचारले असता आजची बैठक ही केवळ मंडल अध्यक्षांची होती. आमदार निमंत्रित नव्हते. सध्या माझ्यासोबत जे आमदार उपस्थित आहेत. आम्ही सगळे मिळून एका कार्यक्रमाला जाणार आहोत, म्हणून त्यांची उपस्थिती असल्याचे स्पष्टीकरण गोरे यांनी दिली.