

संतोष पवार
कासेगाव (दक्षिण सोलापूर)
बाराव्या शतकातील यादवकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले आणि सिंहासनावर विराजमान महादेवामुळे वेगळेपण जपणारे श्रीक्षेत्र शंभू महादेव मंदिर सध्या जीर्णोद्धारामुळे नव्या रूपात येत आहे. पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिराचे मूळ हेमाडपंती सौंदर्य जपत हे काम प्रगतीपथावर आहे. काम सुरू असले तरी, श्रावण महिन्यात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिरासमोर पिंडीची प्रतिकृती उभारून दर्शनाची विशेष सोय करण्यात आली आहे.
सोलापूर-तुळजापूर मार्गावरील उळे गावाजवळ असलेले हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून, तो एक ऐतिहासिक ठेवा आहे. हे मंदिर १२ व्या शतकातील यादवकालीन हेमाडपंती वास्तुशैलीत बांधलेले आहे. येथील महादेवाची पिंड जमिनीलगत नसून, ती सिंहासनावर विराजमान आहे, जी अत्यंत दुर्मिळ बाब मानली जाते. काळाच्या ओघात जीर्ण झालेले मंदिराच्या सभामंडपाचे दगड बदलण्याचे काम अत्यंत कुशलतेने सुरू आहे. मूळ रचनेला धक्का न लावता, केवळ खराब झालेले दगड बदलून मंदिराला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त करून दिले जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हे काम अविरत सुरू असून, ते पूर्ण होण्यास आणखी वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यासोबतच, परिसरातील श्रीगणपती आणि श्रीबळी मंदिरांचाही जीर्णोद्धार केला जात आहे.
मंदिराचे काम सुरू असले तरी, येथील नित्य पूजा आणि आरतीची परंपरा खंडित झालेली नाही. गुरव समाजाकडून पिढ्यानपिढ्या ही सेवा श्रद्धेने पार पाडली जात आहे. श्रावण महिन्यात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, मंदिर प्रशासनाने मंदिरासमोर श्रीशंभू महादेवाची प्रतिकृती स्थापन केली आहे. यामुळे पंचक्रोशीतील भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येत आहे.
सुमारे सात वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून मंदिराच्या शिखराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. विशेष म्हणजे, शिखरावरील सुवर्ण कळस हा कासेगावच्या सासरी गेलेल्या लेकींनी दिलेल्या योगदानातून साकारला गेला, जो गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक आहे. जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्यावर हे मंदिर एक प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनस्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
"कासेगाव येथील पौराणिक शंभू महादेव मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून, बाराव्या शतकातील यादव राजवटीच्या हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा भव्य आणि जिवंत नमुना आहे. काळाच्या ओघातही जपले गेलेले हे मंदिर गावाच्या सांस्कृतिक अस्मितेचे तेजस्वी प्रतीक ठरते आणि आजही ते इतिहास, भक्ती आणि वास्तुकलेचा साक्षात अनुभव घडवते."
- ह.भ.प. धर्मराज वाडकर (महाराज), कासेगाव