

सोलापूर : राज्यात मागील आठ वर्षांत टीईटी, आरोग्य विभागाचे प्रत्येकी तीन आणि म्हाडा भरतीमधील एक, असे एकूण सात पेपर फुटल्याची माहिती समोर आहे. ही पेपरफुटी केव्हा थांबणार, असा संतप्त सवाल परीक्षार्थ्यांमधून विचारला जात आहे.
राज्यात स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवणे हे सरकारपुढील मोठे आव्हान ठरले आहे. २०१८ ते २०२६ या आठ वर्षांच्या काळात किमान सात प्रमुख परीक्षा पेपरफूट, गुणांमधील फेरफार आणि गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. सरळसेवा भरतीतील घोटाळे रोखण्यासाठी ही जबाबदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) सोपवण्यात आली होती. मात्र, अलिकडेच एमपीएससीच्या परीक्षांमध्येही गैरप्रकारांचे आरोप झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
खासगी कंपन्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी राज्य सरकारने भरतीची जबाबदारी एमपीएससीकडे दिली होती. यामुळे भरती प्रक्रियेतील गैरप्रकार थांबतील आणि पारदर्शकता येईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र, औषध निरीक्षक परीक्षेतील अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांचे संबंध आणि पेपर गैरप्रकाराचे आरोप समोर आल्यानंतर एमपीएससीच्या यंत्रणेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टीईटीच्या गुणात फेरफार अन् पेपरफुटी
२०१८ (महाराष्ट्र टीईटी) : तपासणीदरम्यान गुणांमध्ये फेरफार आणि गैरव्यवहार उघडकीस आला.
२०२० (महाराष्ट्र टीईटी) : ओएमआर सीट व सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून गुण वाढवल्याचे आरोप
२०२६ (महाराष्ट्र टीईटी परीक्षा) : परीक्षेच्या पूर्वसंध्येला प्रश्नपत्रिका जप्त, परीक्षा पुढे ढकलली.
आरोग्य विभागाला पेपरफुटीचा कलंक
२०२१ (आरोग्य विभाग गट-क) : परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा गंभीर आरोप.
२०२१ (आरोग्य विभाग गट-ड) : कथित पेपरफुटीनंतर परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची वेळ.
२०२६ (एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा) : पेपरफुटीचे आरोप आणि चौकशीची मागणी; अधिकृत निष्कर्ष अद्याप प्रलंबित.
म्हाडाचा एक फुटला पेपर
२०२१ (म्हाडा भरती) : कथित पेपरफुटीमुळे भरती परीक्षा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबवण्यात आली.