

मरवडे: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा , गोवा व तामिळनाडू या राज्यात हालमत संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात प्रसिध्द तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या धनगर समाजाचे आराध्य दैवत हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील महालिंगराया व हुन्नूर येथील बिरोबा या गुरु शिष्यांसह सात देवतांच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी हजारो टन भंडारा, खारीक, खोबरे, लोकराची उधळण करीत, महालिंगरायाच्या नावानं चांगभलं..... बिरोबाच्या नावानं चांगभलं..... च्या गजराने परिसर दणाणून गेला होता. गुरुवारी रात्री मुंडास बांधण्याचा सोहळा पार पडल्यानंतर शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास महालिंगराया मंदिरालगत असणाऱ्या ओढ्यात शिष्य महालिंगराया , ब्रम्हदेवाचा मुलगा व महालिंगरायाचे गुरु हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथील बिरोबा,
बिरोबा देवाचा वडील उटगी (ता. जत) येथील ब्रम्हलिंग, सोन्याळ (ता. जत) येथील विठठल, महालिंगरायाचा नातू कसगी (ता. उमरगा, जि धाराशिव) येथील ब्रम्हलिंग, शिराढोण (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील शिलवंती व बिरोबा, जिरंकलगी (ता. चडचण, जि. विजयपूर) येथील बिरोबा, बिज्जरगी (ता. विजयपूर, जि. विजयपूर) येथील बुळाणसिदध या पालख्यांच्या भेटी झाल्या.
नगारा- ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगरायाच्या पालखीला भेट देत असताना महालिंगरायाच्या नावानं चांगभलं.. बिरोबाच्या नावानं चांगभलं.. गजरात आकाशात भंडारा, लोकर, खारीक, खोबरे उधळण्यात आल्याने संपूर्ण परिसर भंडार्याने न्हाऊन निघाला होता. या भेटीचा सोहळा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी सहा राज्यातील अंदाजे चार ते पाच लाख भाविकांनी याची देही याचा डोळा अनुभवला.
भाविकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी तहसिलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन केले होते. यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात्रा कालावधीत कोणत्याही साथीचे आजार पसरू नये, यासाठी सलगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कांबळे व डॉ. अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य पथक कार्यरत होते.