

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात जनावरामध्ये ‘लम्पी’ आजाराचा फैलाव वाढत आहे. आत्तापर्यंत एक हजार 544 जनावरांना ‘लम्पी’ आजाराची लागण झाली आहे. त्यातील एक हजार 108 जनावरे बरी झाली आहेत. तर 33 जनावरांचा ‘लम्पी’ आजारामुळे मृत्यू झाला आहे.
‘लम्पी’ आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी ‘लम्पी’ संसर्ग झालेले क्षेत्र प्रतिबंध क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. तसेच जनावरांच्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालून ‘लम्पी’ प्रतिबंधक लस बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘लम्पी’चा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात ‘लम्पी’चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझा गोठा स्वच्छ गोठा अभियान राबविण्याचे आदेश तालुकास्तरावर दिल्याने पावसाळ्यात गोठ्यांची स्वच्छता होणार आहे. गोठा स्वच्छ झाल्यास लंपीसह अनेक रोगांचा प्रार्दुभाव कमी होण्यास मदत होणार आहे.
गायवर्ग जनावरांना ‘लम्पी’ आजाराचा सर्वाधिक धोका असल्याने जिल्ह्यातील गायवर्ग जनावरांना ‘लम्पी’चा डोस देण्यात आला आहे. तर काही जनावरांना ‘लम्पी’चे लसीकरण बाकी असून, ते पूर्ण करण्याची जबाबदारी पशुसंवर्धन विभागावर आहे. मात्र, त्याकडे विभाग दुर्लक्ष करत असल्याने जिल्ह्यातील ‘लम्पी’चा फैलाव वाढत असल्याची तक्रारी शेतकर्यांतून होत आहे.
‘लम्पी’ बाधित जनावरे - 1544
बरे झालेली जनावरे - 1108
मृत झालेली जनावरे - 33
उपचार सुरू असलेली जनावरे - 403
जिल्ह्यात ‘लम्पी’ आजाराचा फैलाव वाढत आहे. मात्र, जिल्ह्यातील 20 टक्यापेक्षा जास्त जनावरांना अद्यापही ‘लम्पी’चे लसीकरण झाले नाही. त्यामुळे त्या जनावरांना लसीकरण करण्यासाठी तातडीने एक लाख 90 हजार लसीची मागणी पशुसंवर्धन विभागाने केली आहे. ती प्राप्त झाल्यास उर्वरित जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात ‘लम्पी’चा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे ‘लम्पी’ झालेली जनावरे इतरत्र बांधणे, त्या गोठ्यात औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील 80 टक्के जनावरांना लंपीचे लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण लवकरच करण्यात येईल.
डॉ. विशाल येवले, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय