

मोडनिंब : येथून अरण, वरवडे, आहेरगाव, अकुंभे ते टेंभूर्णी गावापर्यंत सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या साईडपट्ट्यालगत मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्याप्रमाणे सर्व्हिस रोडवर वरवडे टोलनाक्याच्या एक किलोमीटर अंतरावर मोठी साधारण चार इंचाची आडवी तर 25 ते 30 फूट उभी मोठी भेग पडली आहे. याबाबत वरवडे टोल नाका कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
कुठे रस्ता अपूर्ण तर कुठे सोलापूरला गेलेल्या समांतर जालवाहिनीच्या कामामुळे सर्व्हिस रोडच्या साईडपट्ट्याच गायब झाल्या आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोडने जाणार्या वाहनधारकांना अंदाज येत नाही व त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्याचबरोलबर रस्त्याच्या साईडच्या बाजूस मोठ- मोठे खड्डे तयार झालेे आहेत. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत.साईडपट्ट्या दुरुस्त करण्यात याव्यात तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. काही ठिकाणी हा रस्ता खचू लागला आहे. ही बाब स्थानिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या निदर्शनास आणून दिली. मात्र कोणतीही कार्यवाही झाली नाही.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्या समांतर जलवाहिनीचे मोडनिंब बसस्थानक परिसरातील काम पूर्ण झाले आहे. जलवाहिनीच्या कामासाठी बसस्थानक कार्यालयाच्या समोरून खोदाई करण्यात आली होती. तेही काम सर्व्हिस रोडला चिटकून आहे खोदाई कामातून निघालेल्या मातीमूळे वाहतूक नियंत्रक कक्ष कार्यालयासमोर चिखल पसरल्यामुळे तेथील निसरडी जागा तयार झाली आहे. यामूळे बस चालक, वाहकांसह प्रवाशी त्रस्त झाले आहेत. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण याकडे डोळे झाक करीत आहे.
वरवडे टोलनाक्याच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांची वाहनचालकांकडून टोल वसुली होते. प्रत्यक्षात मात्र त्या वाहनचालकांना रस्त्यांवरचे, साईड पट्ट्यालगतचे खड्डे यातून धोकादायकरित्या मार्ग काढण्याची वेळ आली आहे. रस्त्याच्या साईड पट्ट्यालगत आधार म्हणून लावण्यात येत असलेला मुरूम न लावल्यामुळे पावसाळ्यात त्याठिकाणचे खड्डे झाले असून रात्री अंधारात दुचाकी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्याची होत आहे.