

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भारत सरकारने नुकतीच बदली केली असून गेल्या चार वर्षापासून मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून चांगला कारभार केला होता. कोरोना काळात केलेले काम उल्लेखनीय होते. तसेच त्यांच्या कारकिर्दीत नव्या महसूल भावनांची उद्घाटन, सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गाची मोजणी आणि रिंग रोडचे काम ही कामे उल्लेखनीय झाली होती.
त्यामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांना मुदतवाढ मिळेल अशी परिस्थिती असताना शुक्रवारी अचानक भारत सरकारने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये शंभरकर यांना महात्मा फुले जन आरोग्य अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मुंबईला पाठवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली करण्यात आलेली आहे. शंभरकर यांची अचानक बदली झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.