

Kartiki Ekadashi
पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या महापूजेनंतर राज्यातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे, बळीराजाला सुखी ठेव, सर्व क्षेत्रात राज्य पहिल्या नंबरवर येऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाकडे घातले.
कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आज पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान यंदा प्रथमच देण्यात आला. आषाढी नंतर कार्तिकी अशा दोन्ही एकादशीला महापूजा करणारे एकनाथ शिंदे हे मानकरी ठरले आहेत. शिंदे यांनी आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा केली. महापूजेवेळी देवाला गुलाबी अंगी, केसरी सोवळे, सोन्याचा मुकट, गळ्यात तुळशी माळ, असे देवाचे रूप सुंदर दिसत आहे.
जोपर्यंत हातपाय चालू आहेत तोपर्यंत पंढरपूरची वारी करायची इच्छा आहे. विठ्ठलाने सार काही दिलं. आता पाऊस थांबू दे. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं विठ्ठलाची महापूजा आपल्या हातून घडेल, अशी प्रतिक्रिया मानाचे वारकरी रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर यांनी दिली. महापूजेनंतर वालेगावकर दांपत्याला अश्रू अनावर झाले होते.
कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला आकर्षक देशी-विदेशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांनी ही सजावट केली आहे. या सजावटीसाठी झेंडू,आष्टर, गुलाब, ऑर्कीड, लिली, ग्लाॅडिओ, कॉर्नेशियन, मोगरा, गुलछडी यासह विविध ३० प्रकारच्या ५ टन फुलांचा आणि पानांचा वापर करण्यात आला आहे. सजावटीमुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे. ही सजावट देवाचे प्रवेशद्वार चौखांबी, सोळखांबीसह सभा मंडपामध्ये व संत नामदेव पायरी येथेही करण्यात आली आहे.