

सांगोला : एकेकाळी गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग असलेली ज्वारीची भाकरी आता महागाईमुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहे. गरिबांच्या भाकरीला जणू श्रीमंती थाट आला आहे. ज्वारीचे दर शंभरीच्या घरात पोहोचल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.
दुष्काळी सांगोला तालुक्यात ज्वारीला विशेष महत्त्व असून येथील बहुतांश ग्रामीण कुटुंबांच्या आहारात ज्वारीच्या भाकरीला आजही प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदा पावसातील अनियमितता, जमिनीतील ओलाव्याची कमतरता आणि रब्बी पेरणीवर झालेला परिणाम यामुळे ज्वारीच्या उत्पादनाबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यातच बाजारातील आवक कमी झाल्याने ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.
काही महिन्यांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो दराने मिळणारी ज्वारी आता ७० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचली असून उत्तम प्रतीची गावरान, मालदांडी आणि शाळू ज्वारी १०० रुपये किलोच्या घरात गेली आहे. म्हणजेच क्विंटलमागे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मोजण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. ज्वारीच्या प्रकारानुसार आणि गुणवत्तेनुसार दरात फरक असला तरी सर्वच प्रकारांमध्ये दरवाढ जाणवत आहे.
सांगोला तालुक्यातील ग्रामीण परिसरात ज्वारीची भाकरी रोजच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ आहे. पूर्वी स्वत:च्या शेतात पिकवलेली ज्वारी वर्षभर पुरत होती. मात्र, उत्पादनातील अनिश्चितता आणि वाढता शेतीखर्च सिंचनाची सुविधा यामुळे अनेक शेतकयांनाही आता बाजारातून खरेदी करावी लागते. तालुक्यातील बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. पावसाचे असमान वितरण आणि जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रब्बीतील पेरणीवर परिणाम होत आहे. पाण्याची उपलब्धता नसल्याने अनेक शेतकऱ्यांना पेरणीचे क्षेत्र कमी ठेवावे लागत आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.