

सोलापूर : सोलापुरात एकाच दिवशी तीन घरफोडी करून तब्बल वीस लाखांचा मुद्देमाल चोरणार्या दोन आंतरराज्यीय चोरट्यांना सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्यांनी चोरलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली.
विजापूर रोडवर राहणार्या सतीश शिवप्पा सोलापुरे यांच्या घराचे 21 नोव्हेंबर रोजी कुलूप तोडून चोरट्यांनी 4 लाख 87 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. त्यानंतर सैफुल येथील एल. श्रवणकुमार लगून यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 19 लाख 33 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरले, तर पूजा सचिन जाधव यांच्या घरातदेखील चोराचा प्रयत्न करण्यात आला.
एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी झाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठवडाभरात कर्नाटकातील दोन आंतरराज्य चोरट्यांना पकडले. राघवेंद्र उर्फ रघू उर्फ नागराज शंभू नाईक (वय 32, रा. मण्णेगीगांव, ता. होन्नावार, जि. कारवार, कर्नाटक) आणि त्याचा साथीदार लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक (वय 28, रा. वसूर, बेळगाव, कर्नाटक) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 13.3 तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच एक किलो 840 ग्रॅम चांदीचे दागिने आणि वस्तू असा एकूण 20 लाख 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हे दोघे सराईत गुन्हेगार असून एकावर तीन तर दुसर्यावर सहा गुन्हे दाखल आहेत.
गुन्हे शाखेने अत्यंत कुशलतेने तपास करुन हे तीन्हे गुन्हे उघडकीस आणले तसेच मुद्देमालही जप्त केल्याचे एम. राजकुमार यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. आश्विनी पाटील, सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने उपस्थित होते.
सदरची कामगिरी सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद रजपुत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, राजेश मोरे, सिध्दाराम देशमुख, अजय गुंड, महेश रोकडे, बाळासाहेब काळे, घोरपडे, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, रतिकांत राजमाने यांनी पार पाडली.
चोरटे दागिने विक्री करण्यासाठी सोलापुरात येणार असल्याचे समजल्यावर सापळा रचला. हे दोघे त्या ठिकाणी आल्याचे कळताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांनी सोलापुरात तीन घरफोडी करुन चोरलेला 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कर्नाटकात कोणीही दागिने घेत नसल्याचे कळताच ते सोलापुरात सोन्याचांदीचे दागिने विकण्यासाठी आले होते.